रैनाची सुरेख अर्धशतकी खेळी
चेन्नई, १ मे
रैना आज पुन्हा एकदा चमकला आणि आपल्या सुरेख अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्याने चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. विजयाच्या रथावर स्वार झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला सुरेश रैनाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांचा पल्ला गाठता आला. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने खेळपट्टीचा पोत पाहून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला यावेळी मुरली विजयच्या (३) रुपात पहिलाच जोरदार धक्का बसला. पण मायकेल हसी आणि सुरेश रैना यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचत संघाला या धक्क्यातून सावरले. हसीने यावेळी पाच चौकारांच्या मदतीने ४६ धावा फटकाविल्या. हसीचे अर्धशतक होईल, असे वाटत असतानाच त्याला हरमीत सिंगने तंबूचा रस्ता दाखवला. हसी बाद झाल्यावर सामन्याची सर्व सूत्रे रैनाने हातात घेतली. त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ लाभत नसली तरी त्याने ३५ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी साकारली. रैना बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनी (२१), अॅल्बी मॉर्केल (१९), एस. बद्रीनाथ (नाबाद ५) आणि अनिरुद्ध श्रीकांत (नाबाद ३) यांना मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्यांना १६५ धावांवरच समाधान मानावे लागले. डेक्कन चार्जर्सतर्फे यावेळी प्रग्यान ओझाने चांगली कामगिरी केली. त्याने अचूक फिरकी माऱ्याच्या जोरावर २६ धावांमध्ये सलामीवीर मुरली विजय, अर्धशतकवीर सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी या तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. तर हरमीत सिंगने २६ धावा देत मायकेल हसीला बाद केले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज-: २० षटकांत ५ बाद १६५ (सुरेश रैना ५९, मायकेल हसी ४६, प्रग्यान
ओझा २६ धावांत ३ बळी)