अकलूज

अकलूज हे नीरा नदीकाठी वसलेले आहे.

इतिहासः अकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपुर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हट्ले जाते कि १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी नास्तव्यास होते. दुसरे बाजीरव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते.
सहकारी साखर कारखानदारीनंतर राज्यात उदयास आलेल्या एका प्रमुख सत्ताकेंद्रापैकी एक म्हणजे अकलूज. अकलूज हे गाव माळशिरस तालुक्यातील. तालुक्यातील ठिकाण माळशिरस असले तरी महाराष्ट्रातील जनतेला अकलूजचाच जास्त परिचय.
संस्थानिकांची घराणी आजही काही प्रमाणात अस्तित्वात असली, त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात जमीनजुमला असला तरी लोकशाही शासन प्रणालीमुळे संस्थानिकांचे महत्त्व कमी कमी होत असल्याचे आढळून येत आहे. पूर्वी सत्ता गाजविलेल्या ज्या मंडळींनी लोकशाही प्रणालीशी जुळवून घेतले, आपल्या जनतेशी नाळ तोडली नाही, त्यांच्याकडे जनतेने स्वत:हून नेतृत्व दिल्याचेही दिसून आले. पण स्वातंत्र्यानंतर हळूहळू त्या संस्थानिकांचा विसर लोकांना पडू लागला. त्यांचा रूबाबही ओसरला. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवी सत्ताकेंद्रे उभी राहू लागली. त्या सत्ताकेंद्रांनी आपले पाय भक्कम रोवले. त्या सत्ताकेंद्राकडून संबंधित भागाचा विकास झाला की नाही, असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर होय, असे दिले जाऊ शकते. पण त्या उत्तराशी सर्वच सहमत होतील असे नाही. शहरात राहणाऱ्यांना ग्रामीण भागात असलेली ही सत्ताकेंद्रे म्हणजे लोकशाहीत अस्तित्वात आलेली नवी संस्थाने वाटतात, मग अशा सत्ताकेंद्रांच्या पाश्र्वभूमीवर निघालेला ‘सामना’सारखा एखादा चित्रपट जनमानसात प्रचंड खळबळ उडवून जातो. सहकाराच्या माध्यमातून समाजाचा विकास करताना खरे म्हणजे जी वृत्ती असायला हवी त्याचे दर्शन ग्रामीण भागातील सत्ताकेंद्रांमधून होतेच असे नाही. संबंधित सत्ताकेंद्राबद्दल सर्वच मंडळी चांगले बोलतात असेही दिसत नाही. असे का होते? कशामुळे होते? सहकाराच्या माध्यमातून सत्ता केंद्र आपल्या ताब्यातून जाऊ नयेत, यासाठी चाललेली धडपड कोणत्या थराला जाऊ शकते, याच्या सुरस कथा सुजाण वाचकांच्या कानावर येत असतात. पण ग्रामीण भागातील सत्ताकेंद्रांमुळे विकास झालाच नाही का? का तेथील मंडळी केवळ स्वत:चेच हित साधत आहेत? या प्रश्नांना दोन बाजू आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ आणि ‘नाही’ अशी आहेत. सत्ताकेंद्रांमध्ये जी विरोधक मंडळी आहेत ती अशा सत्ताकेंद्रांमुळे काहीच विकास झाला नाही, अशा टोकाच्या प्रतिक्रिया देणारीही आहेत.
सहकारी साखर कारखानदारीनंतर राज्यात उदयास आलेल्या एका प्रमुख सत्ताकेंद्रापैकी एक म्हणजे अकलूज. अकलूज हे गाव माळशिरस तालुक्यातील. तालुक्यातील ठिकाण माळशिरस असले तरी महाराष्ट्रातील जनतेला अकलूजचाच जास्त परिचय. अकलूजमुळे माळशिरस तालुक्याचा विकास झाला असे म्हणण्यासारखी स्थिती असली तरी तालुक्यातील सर्वानाच ते मान्य आहे, असे नाही. अकलूज, तसेच माळशिरस तालुका हा तसा मागास भाग. पण या भागाचा विकास करण्यात ज्यांचे योगदान मोठे आहे त्यात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते त्यात अग्रणी राहिले आहेत शंकरराव मोहिते- पाटील. माळशिरस तालुक्यात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील झाले नसते तर तालुक्याचा तसेच मोहिते- पाटील ज्या अकलूज गावचे पाटील होते त्या गावाचा, त्या परिसराचा सध्या दिसतो तेवढा विकास झाला नसता, ही वस्तुस्थिती आहे. माळशिरस तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजकारण, राजकारणात सक्रिय असलेल्या शंकरराव मोहिते- पाटील यांनी अकलूज परिसराच्या, माळशिरस तालुक्याचा विकासाचा ध्यास घेतला. अकलूजमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. विद्यार्थ्यांंसाठी वसतिगृहाचीही स्थापना केली. आपल्या परिसरातील मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे हा हेतू पुढे ठेवून शंकरराव मोहिते- पाटील यांनी जे बीज रोवले त्याचा वटवृक्ष झाल्याचे आज पाहायला मिळत आहे. अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या संस्थांमध्ये आजघडीला सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंजिनीअरिंग आणि मेडिकल फॅकल्टी सोडून आमच्या संस्थांमध्ये सर्व प्रकारे शिक्षण घेण्याची सोय असल्याचे सहकार महर्षीचे नातू आणि नुकतेच राज्यसभेचे खासदार झालेले रणजितसिंह मोहिते- पाटील हे मोठय़ा अभिमानाने सांगतात. १९४८ साली मूठभर विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेल्या संस्थेने आज विशाल वृक्षाचे रूप धारण केले आहे, हे कोणालाही मान्य करावेच लागेल.
शंकरराव मोहिते- पाटील यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाल्याचे चित्र जसे दिसते तसेच चित्र त्यांनी सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या विविध संस्थांचे दिसत आहे. प्रारंभी शेतकरी कामगार पक्षात कार्यरत असलेल्या शंकररावांनी सहकारी साखर कारखाना उभारण्याचा ध्यास घेतला. जवळपास म्हणावी तशी साधनसामग्री नाही, पुरेसे धन नाही अशा स्थितीत साखर कारखाना उभारण्यासाठी त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू केले. १९५६ साली कारखान्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शंकरराव पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केले. त्या वेळी यशवंतराव काँग्रेसचे नेते होते; तर शंकरराव शेकापचे. पुढे २१ एप्रिल १९६० ला शंकरराव मोहिते- पाटील यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. त्या आधी काही दिवसच शंकरराव मोहिते- पाटील शेकाप सोडून काँग्रेसवादी झाले. याच दरम्यान सहकारी साखर कारखान्या’चे रजिस्ट्रेशन झाले. या कामी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे अमूल्य सहकार्य मिळाले. शंकरराव मोहिते-पाटील यांचे यशवंतराव मोहिते हे खास मित्र. तसेच शंकररावांचे जन्मनावही ‘यशवंत’. त्यातून कारखान्याचे नाव ‘यशवंत सहकारी साखर कारखाना’ असे करण्यात आले. माळशिरस तालुक्याच्या, विशेषत: अकलूजच्या विकासामध्ये या कारखान्याचे योगदान खूप मोठे आहे. १९६० साली अस्तित्वात आलेल्या या कारखान्याचे आजमितीस २००४५ सभासद आहेत आणि कारखान्याचे भागभांडवल ४३०३.२२ लाख इतके आहे. सुरुवातीला काही शेतकऱ्यांना घेऊन सुरू केलेल्या या कारखान्याने तालुक्यातच नव्हे तर सरकारी साखर कारखानदारीत चांगले नाव कमावले आहे. शिक्षणसंस्था, साखर कारखाना उभारल्यानंतर शंकरराव मोहिते-पाटील यांनी मागे वळून पाहिलेच नाही. राजकारण, समाजकारण करीत विविध सहकारी संस्थांचे जाळे विणण्यास त्यांनी प्रारंभ केला, आज माळशिरस तालुक्याचा विचार करता त्या तालुक्यात सहकारी संस्थांचे अक्षरश: जाळे पसरले आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर, अकलूज, श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर, शिवामृत सहकारी दूध उत्पादन संघ, विजयनगर, विंझोरी, राजहंस सहकारी कुक्कुटपालन संघ, शंकरनगर अकलूज, शिवकृपा कुक्कुटपालन उद्योजक सहकारी संघ, शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँक, अकलूज, शंकरराव मोहिते-पाटील सहकारी सूतगिरणी लिमिटेड, पिसेवाडी, शिवशंकर सहकारी ग्राहक भांडार, अकलूज, सुमित्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अकलूज अशा अनेकानेक संस्थांचे जाळे अकलूज-माळशिरस परिसरात निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, माळशिरस तालुक्यातील २९ प्रमुख सहकारी संस्थांचे मिळून  २००९ मध्ये एक लाख ३५ हजार ३९१ सभासद  आहेत. त्या सभासदांचे भागभांडवल १०६३९.४४ लाख रुपये इतके आहे. या सर्व सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल आहे १५४०५१.२८ लाख रुपये. या सर्व प्रमुख २९ सह. संस्थांमुळे ३२७२ जणांना कायमस्वरूपी, २१२२ जणांना हंगामी स्वरूपाची नोकरी मिळाली आहे. तर सहकारी संस्थांमुळे जवळजवळ ८१ हजार ३२८ जणांना अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
सहकाराच्या क्षेत्रात शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाल्याचे चित्र १९६०-१९७०च्या दशकात स्पष्टपणे दिसू लागले होते. काँग्रेसमध्ये राजकारण करत असताना माळशिरस तालुक्यावर आपली मजबूत पकड बसवत जिल्ह्य़ाच्या राजकारणातही शंकरराव यांनी मजबूत पावले टाकली होती. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर त्यांनी नियंत्रण प्रस्थापित केले होते. सोलापूर जिल्हा परिषदही ताब्यात घेतली होती. शंकरराव मोहिते-पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव, राज्याचे विद्यमान ग्रामीण विकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी वयाच्या अवघ्या २८ वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. १९७२ पासून १९७८ पर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील ऊर्फ विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. (वर ज्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख आला त्या बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत सहकारमहर्षीचे नातू आणि विजयदादांचे चिरंजीव खासदार रणजितसिंह ऊर्फ रणजितदादा.)
राजकारण, समाजकारण करता करता ११ फेब्रुवारी १९७९ला शंकरराव मोहिते-पाटील निवर्तले. वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे निधन झाले. सहकारमहर्षीच्या निधनानंतर त्यांनी सहकाराचे जे जाळे निर्माण केले होते ते सांभाळण्याची, वाढविण्याची जबाबदारी प्रामुख्याने पडली ती विजयदादांच्या खांद्यावर. सहकारमहर्षीच्या पश्चात राजकारणात सक्रिय राहात, राजकारणात स्वत:चे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करीत संपूर्ण तालुक्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपली मजबूत पकड बसविली. तालुक्याचे, जिल्ह्य़ाचे राजकारण करीत महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. १९८० ते ८५ या काळात आमदार, त्याच दरम्यान राज्यमंत्रिपद, १९८५ ते १९८८ पुन्हा विधानसभा सदस्य, कॅबिनेट मंत्रिपद, १९९०ला पुन्हा निवड, पुन्हा विविध पदांची जबाबदारी असलेले कॅबिनेट मंत्रिपद, ९५ला परत विधानसभेवर निवड. त्या वेळीही कॅबिनेट मंत्रिपद, २५ डिसेंबर २००३ला विजयदादांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाचीही माळ पडली. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाटचाल केलेले विजयदादा अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्याकडे ग्रामीण विकास, पर्यटन अशी खाती आहेत. एकीकडे महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विविध संस्था आपल्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या हाती कशा राहतील हे मात्र मोहिते-पाटील घराण्याकडून आवर्जून पाहिले गेले. महाराष्ट्राचे राजकारण करणाऱ्या विजयदादांनी आपले भाऊ राजसिंह, जयसिंह, मदनसिंह, प्रतापसिंह, उदयसिंह यांच्या मदतीने तालुक्यात उभारलेल्या सहकारी संस्थांवर आपली मजबूत पकड बसविली. जिल्ह्य़ाच्या राजकारणावरही स्वत:चा ठसा उमटविणे चालूच ठेवले. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासून सहकार क्षेत्रात मोहिते-पाटील यांचा जो दबदबा निर्माण झाला तो त्यांच्या मुलांकडून टिकविला जात आहे. सहकारमहर्षीची नातवंडेही सक्रिय राजकारणात उतरली असून सरपंच, उपसरपंचपदापासून खासदारपदापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत. अकलूज, माळशिरस परिसरात मोहिते-पाटील घराण्यावाचून पानही हालत नाही असे म्हटले तर ते मुळीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
आमच्यावर जो घराणेशाहीचा आरोप केला जातो त्यात काही तथ्य नाही. आपल्याकडे लोकशाही असल्याने चांगले काम केले तरच लोक पदावर ठेवतील अन्यथा नाही, असे मत ग्रामीण विकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आहे. आपल्यावर लोकांचा विश्वास असल्यानेच लोक आपल्यामागे उभे राहतात, असे त्यांचे म्हणणे. सहकारी संस्था या लोकांच्या संस्था आहेत त्या संस्थांचे आपण विश्वस्त म्हणून काम करीत आहोत एवढे लक्षात ठेवून वागले की, आक्षेप घेतले जाण्याचे कारणच नाही, असे त्यांचे मत आहे.
पण विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधकांना मात्र तालुक्याचा चांगला विकास झाल्याचे मान्य नाही तसेच पंचायत राज व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, तसे न होता सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचेच दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे. गेल्या कित्येक वर्षांपासून माळशिरस तालुक्यातील अनेक सहकारी संस्था मोहिते-पाटील यांच्या ताब्यात आहेत. जंग-जंग पछाडूनही विरोधकांना या गडाना खिंडार पाडता आले नाही. आरोपांच्या फैरी झाडल्या जातात, पण मोहिते-पाटील यांच्या सहकार क्षेत्रात उभारण्यात आलेल्या मजबूत किल्ल्याचा साधा चिराही विरोधकांना पाडता आलेला नाही.
विस्कळीत, एकवाक्यता नसलेला विरोधी पक्ष केवळ आरोप करण्यापलीकडे सद्य:स्थितीत तरी काही करू शकत नाही, असे चित्र आहे. मोहिते-पाटील घराण्याचा जो कारभार चालतो त्यावर तुटून पडणारे विरोधक कोणताही हातचा राखून न ठेवता त्यांच्यावर घसरतात. वानगीदाखल काहीजण काय म्हणतात ते पाहू.
माळशिरसच्या कोर्टात प्रॅक्टिस करणारे अ‍ॅड्. सुभाष पाटील हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य. राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय, भारतीय जनता पार्टीत काही वर्षे घालवलेला हा नेता मोहिते-पाटील यांच्यामुळे तालुक्याचा पूर्णपणे विकास झाला, असे मानायलाच तयार नाही. तालुक्यातील ठराविक भागाचाच विकास झाला. तालुक्यावर सत्तेच्या माध्यमातून वर्चस्व गाजविले जात आहे आणि या मंडळींनी सत्तेचे केंद्रीकरण केले असून स्वत:चा भरपूर विकास साधला आहे, असे त्यांचे म्हणणे. एकेकाळी भाजपमध्ये असलेले अ‍ॅड्. सुभाष पाटील यांना भाजप-सेनेची राज्यात सत्ता असतानाही अत्यंत वाईट अनुभव आला. आमची कामे करण्याऐवजी सत्तेवर असलेल्यांनी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचीच कामे केली, असे ते म्हणतात. विनाअनुदान तत्त्वावर सुरू केलेल्या आपल्या दोन शाळांना या काळात मान्यताही मिळू शकली नाही, अशा शब्दात ते आपली नाराजी व्यक्त करतात. तालुक्यातील राजकारणामध्ये आपले फारसे काही चालणार नाही हे लक्षात आल्याने साठी ओलांडलेले अ‍ॅड्. सुभाष पाटील राजकारण निवृत्तीची भाषा करीत आहेत. तालुक्याचा एकांगी विकास झाला. निवडणुकीच्या वेळी अकलूज परिसरातच एवढे मतदान होते की, ‘त्यांना’ तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण भागाची गरजच भासत नाही. त्यातून अशा भागाकडे दुर्लक्ष केले जाते. विरोधक एकत्र आले तर विद्यमान परिस्थितीत बदल होऊ शकतो, असे ते म्हणतात. (नजीकच्या भविष्यकाळात असे होण्याची चिन्हे दिसत नाहीत.) अ‍ॅड्. सुभाष पाटील हे एमए एलएलबी  झालेले. निवडणुका चांगल्या वातावरणात होण्यासाठी मतदान सक्तीचे करावे, इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करण्याची सोय करावी, अशा त्यांच्या काही सूचना आहेत पण एकूणच एकटय़ाच्या ताकदीवर राजकारण करणे कठीण जात असल्याने राजकारणातून बाजूला व्हायचा विचार ते बोलून दाखवितात.
राजकुमार पाटील हे सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष. मोहिते-पाटील यांचे ते कट्टर राजकीय विरोधक. त्यांचे घराणे राजकारण्यांचे. राजकुमार पाटील यांचे आजोबा शंकरराव ऊर्फ रावसाहेब पाटील बोरगावकर हे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी त्यांनी प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सोलापूरला आणले होते. राजकुमार पाटील यांचे ७२ वर्षांचे वडीलही सक्रीय राजकारणात तेही माळेवाडी-बोरगावचे सरपंच. माढय़ाचे गणपतराव साठे हे राजकुमार पाटील यांच्या आईचे वडील (गणपतराव साठे हे धनाजी साठे यांचे वडील). त्यामुळे दोन्हीकडच्या आजोबांकडून राजकारणाचा वारसा राजकुमार पाटील यांच्याकडे आलेला. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केलेले राजकुमार पाटील नंतरही भाजपमध्येच राहिले. भाजप सोडण्यास त्यांनी ठाम नकार दिला.
मोहिते-पाटील घराण्यासमवेत काम केलेले राजकुमार पाटील त्यांच्या कामाबद्दल मात्र अत्यंत कडवट प्रतिक्रिया व्यक्त करतात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्णपणे मोहिते-पाटील यांच्या ताब्यात असल्याने त्या बँकेच्या माध्यमातून विरोधकांना पुढे येऊ न देण्याचे प्रयत्न चालूच असतात, असे राजकुमार पाटील म्हणतात. विजयदादा जवळजवळ १३ वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, पण माळशिरस तालुक्यातील ९०% रस्त्यांची वाईट अवस्था आहे, असे ते म्हणतात. तालुक्यातील राजकारणाने लोकांना लाचार बनवले आहे. ६० वर्षांचा म्हाताराही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुढाऱ्यांच्या पाया पडतो, हे काय चांगले लक्षण आहे? हे लाचारीचे नाही तर कशाचे द्योतक आहे? असा राजकुमार पाटलांचा सवाल आहे. माळशिरस तालुक्यावर मोहिते-पाटील घराण्याची जी पकड आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे. पहिला काळ आता राहिला नाही. सर्वानाच बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे जमते असे नाही, असे राजकुमारांचे म्हणणे आहे. सत्ताबदल व्हायचा असेल तर ‘छत्रपतीविरुद्ध छत्रपतीच हवा’, असे त्यांचे मत.
अकलूजपासून अवघ्या पाच मैलांवर अर्धनारीनटेश्वराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले वेळापूर गाव. पूर्वी हे गाव पूर्णपणे मोहिते-पाटील यांच्या बाजूचे. पण आज या गावचे सरपंच आहेत उत्तम जानकर. ते मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक. अकलूज हे संस्थान कसले महासंस्थान आहे. ‘कोणी सरपंच घ्या,’ ‘कोणी चेअरमन घ्या,’ ‘कोणी आमदार घ्या,’ ‘कोणी खासदार घ्या’, अशा पद्धतीने सत्ता आपल्यामध्येच एकवटण्याचा तेथे प्रयत्न होत आहे. लोकांना गुलाम, लाचार बनविले जात आहे. माणसांचा अक्षरश: बैल केला जात आहे. शेतकऱ्यांचा ‘जाणता राजा’ म्हणविणारी मंडळी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत नाहीत, असे त्यांचे म्हणणे.
उत्तम जानकर मूळचे धानोरे गावचे. बी.ए.पर्यंतचे शिक्षण अकलूज महाविद्यालयात घेतलेले. महाविद्यालयात असतानाच मोहिते-पाटील यांच्या विरोधात राजकारण करण्यास त्यांनी प्रारंभ केलेला. भाजपमध्ये १५ वर्षे राहिलेले जानकर, सध्या आपण अपक्ष आहोत, असे सांगतात. तालुक्यातील विरोधक एकत्र येतील आणि ७७ ची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास जानकर यांना वाटत आहे.
मोहिते-पाटील आणि त्यांच्या परिवाराबद्दल, परिवाराच्या हातातील संस्थांबद्दल विरोधी पक्ष अत्यंत कटू टीका करीत असला तरी तालुक्यातील विरोधी पक्षाला मोहिते-पाटील यांच्या सत्तास्थानाला धक्काही लावता आलेला नाही. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील हे ‘करप्ट’ नव्हते, पण आजकाल मात्र चांगला अनुभव येत नाही. हात मारणारे हात मारतात, ज्यांना असे जमत नाही, अशी माणसे ‘मूर्ख’ ठरतात, छातीवर हात ठेवून अमूक व्यक्ती स्वच्छ आहे, असे सांगता येत नाही, असे मत एका ‘जाणकारा’ने व्यक्त केले. तालुक्यात मराठा-धनगर असा वाद भरपूर प्रमाणात आहे, असेही ते म्हणतात.
सहकारमहर्षी शंकरराव  मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले. शंकररावांच्या पश्चात त्यांच्या सहाही मुलांनी एकत्रित राहून आहेत त्या संस्था आपल्या ताब्यात तर ठेवल्याच पण त्याबरोबर नवनवीन संस्था उभारून आपल्या कामाचा व्याप आणखी वाढवला. सहाही भावंडांच्या एकीच्या बळापुढे विरोधकांची काहीच डाळ शिजत नसल्याचा प्रत्यय गेली कित्येक वर्षे तालुक्यातील जनता घेत आहे. ‘विरोधी पक्षांमध्ये कोणी शहाणा नाही,’ असे भाष्य तालुक्याच्या राजकारणाचा उत्तम अभ्यास असलेल्या एका व्यक्तीने केले. ते पाहता विरोधकांचा आवाज मोहिते-पाटील यांच्या भक्कम किल्ल्याच्या दरवाजापर्यंतही पोहोचणार नाही, अशी अवस्था आहे.
माळशिरस तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासामध्ये मोहिते-पाटलांचे आणि त्यांच्या घराण्याचे मोठे योगदान आहे. केवळ अकलूज परिसराचा विकास न करता संपूर्ण तालुक्याचा विकास करण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकल्यास आणि त्याचा दृश्य परिणाम दिसल्यास मोहिते-पाटील यांच्यामागे लोक मोठय़ा संख्येने उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. मोहिते-पाटलांची भक्कम एकी आणि विरोधकांमधील बेकी, याभोवती तालुक्याचे राजकारण फिरत असताना दिसत आहे. लोकशाहीमध्ये, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी, सहकारी संस्थांच्या सभासदांनी निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी सनदशीर मार्गाने आपल्या हाती सत्ता ठेवल्यास आक्षेप घ्यायचे काहीच कारण नाही, पण प्रत्यक्षात तसे दिसते का? हा सर्वानाच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. स्वच्छ, पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यास अशा नेत्यांच्या मागे जनता उभी राहते हे दाखवून देण्याची संधी अजूनही गेलेली नाही. त्या संधीचे सोने करण्याचीच आज गरज आहे.
 
--

solapur pune pravasi sangatana