सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर(शहराने) तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे
विशेष

जन्मासी येऊनी, पहा रे पंढरी !! असे पंढरपूरबाबत म्हटले जाते, ज्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविकच नव्हे, तर दक्षिणेकडील राज्यांतील भाविकही येत असतात असे पंढरपूर तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. यावरूनच सोलापूर जिल्ह्याचे स्थान लक्षात येते. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावाच्या काळात आधुनिकतेचा स्पर्श काहीशा कमी वेगाने सोलापूरला होत असला, तरीही अगत्य, मनमोकळेपणा, थोडासा साधे-भोळेपणा, पारंपरिकता, बहुभाषिकत्व हे इथल्या मातीचे गुण आहेत. पर्यटन, फलोत्पादन, कृषिप्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.
 भूगोल

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.
तालुके
   *  उत्तर सोलापूर
   *  दक्षिण सोलापूर
   *  अक्कलकोट
   *  बार्शी
   *  मंगळवेढा
    * पंढरपूर
    * सांगोला
    *  माळशिरस
    *  मोहोळ
    *  माढा
    *  करमाळा
शेती
हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे, तरी उजनी धरणामुळे येथील बागायत क्षेत्र १८ ते २०% आहे. यावर प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जाते. एकूण ७५ ते ८२ % शेती लहरी पावसावर अवलंबून आहे.

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. रब्बी मोसमातल्या ज्वारीखालील क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर आहे. खरीप ज्वारीचे क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिद्ध आहे. १९९० मध्ये आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. डाळिंब (सुमारे ३० हजार हेक्टर), बोर(सुमारे २० हजार हेक्टर) या पिकांसह आंबा (९ हजार हेक्टर), सीताफळ, आवळा, जांभूळ यांच्या फळबागा, कमी पाऊस असूनही केवळ विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. तसे फळ-प्रक्रिया उद्योगाबद्दलही आकर्षण वाढते आहे. द्राक्षाचीही लागवड जिल्ह्यात अधिकाधइक होत आहे. मोहोळ, पंढरपूर इ. तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र व डाळिंब संशोधन केंद्रही आहे. सोलापूर जिल्ह्यातील कृषितज्ज्ञ व कृषि-अधिकारी श्री.वि. ग. राऊळ यांनी प्रामुख्याने फळबाग क्षेत्रात केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात क्रांती घडवून आणली. डाळींब, बोर तसेच सूर्यफूल, करडई या पिकांबाबत त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून त्यांना संघटितही केले.
उद्योग
सोलापूर औद्यागिकदृष्ट्याही विकसित होत आहे. जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध होता. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्स भारतभर प्रसिद्ध आहेत. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे. काही कंपन्या आपल्या मालाची १००% निर्यातही करतात. सोलापूर शहर व आसपासच्या भागात विडी उद्योग अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उद्योग आहे. सुती कापड उद्योग व विडी उद्योग यांमध्ये प्रामुख्याने तेलुगू भाषिक विणकर समाजाचा मोठा वाटा आहे.

दूध डेअरी, कृषिप्रक्रिया उद्योग, गोमय उत्पादने व साखर कारखाने या उद्योगांच्या माध्यमातून लोकमंगल हा उद्योग जिल्ह्यात अनेकांचे रोजगाराचे साधन बनत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सूत गिरण्या आहेत. कॅम शॅफ्ट्स बनवणारा प्रिसिजन उद्योग जिल्ह्यातील प्रमुख उद्योग बनू पाहतो आहे. तसेच सोलापूर शहराजवळ किर्लोस्कर कंपनीचा शिवाजी वर्क्स लिमिटेड हा इंजिन ऑटो पार्ट्‌स बनवणारा कारखाना आहे. केम येथील हळदीपासून बनवले जाणारे कुंकू प्रसिद्ध असून पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यात पूर्वी अनेक छोट्या-मोठ्या सूत गिरण्या होत्या. हळूहळू यंत्रमाग वाढत गेले. गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट होत असली तरीही आजचे यंत्रमाग, कुशल व कष्टाळू कामगार व मोजके हातमाग यांच्या माध्यमातून मनमोहक साड्या, जेकॉर्ड चादरी, टर्किश टॉवेल्स, पडदे व वॉल हँगिग्ज यांचे उत्पादन आजही सोलापुरात मोठ्या प्रमाणावर होते आहे.
दळणवळण
सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर - विजापूर व मिरज - लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्र्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.

जिल्ह्यातून पुणे-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ जातो. तसेच सोलापूर-विजापूर-मंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ ही जातो. सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ जातो. रत्नागिरी-नागपूर् हा राष्ट्रीय महामार्ग क्र.२०४ ही सोलापूर जिल्ह्यातून जातो.
पर्यटन
धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतो तो प्रामुख्याने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरपूरमुळेच! आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. हे पूर्ण महाराष्ट्राचेच प्रमुख धार्मिक उत्सव आहेत.

महाभारतकाळात भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद राजाला वर दिला. त्यानुसार भक्त पुंडलिकरूपी मुचकुंद राजाला, श्रीकृष्णाने विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून दर्शन दिले, अशी कथा सांगितली जाते. येथे विठ्ठल व रुक्मिणीची मंदिरे वेगवेगळी आहेत. विठ्ठल मंदिर हे शिल्पकलेचा उत्तम नमुनाही मानले जाते. मराठी माणसाची संस्कृती, अध्यात्म व जीवन समृद्ध करणारे काव्य संत-कवींनी रचले, ते विठ्ठलाप्रती असलेल्या भक्ति-प्रेमातूनच! महाराष्ट्रात यादव काळापासून जी सामाजिक व आध्यात्मिक क्रांती सुरू झाली, तिचे प्रमुख केंद्र चंद्रभागेचे वाळवंटच होते. पंढरपूर सोलापूर-कोल्हापूर मार्गावर असून सोलापूरपासून ६७ कि.मी. अंतरावर आहे.

जिल्ह्यात मंगळवेढा येथे श्री दामाजीपंतांचे मंदिर आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अर्धनारी नटेश्र्वराचे एकमेवाद्वितीय असे हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. बाराव्या शतकात यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेल्याचा उल्लेख आढळतो. दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथे भीमा-सीना संगम झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे हे आज जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे संगमावर अकराव्या शतकात बांधलेली (कोरलेली) हरिहरेश्र्वर व संगमेश्र्वर ही अजिंठा-वेरूळची लेणी वेरुळच्या शिल्पकलेशी साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत. या ठिकाणी उत्खननात जगातील एकमेव असे दुर्मीळ शिवलिंग सापडलेले आहे. या ४ फुटी शिवलिंगावर शिवाची ३५९ मुखे व अन्य मूर्ती कोरल्या आहेत. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अनेक दरवाजे ओलांडून सूर्यकिरणे शिवलिंगावर पडतात.

भारतात विष्णु।विष्णूची मंदिरे अतिशय कमी ठिकाणी आहेत. या जिल्ह्यात ते बार्शी येथे आहे. या हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिरामुळे बार्शीला भगवंताची बार्शी म्हणतात. एकादशीला पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेणारा वारकरी द्वादशीला बार्शीच्या भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाही. जिल्ह्यातील सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर, भीमा नदीच्या तीरावर माचणूर येथे महादेवाचे पुरातन मंदिर आहे. अकलूज येथे नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला असून करमाळा येथेही प्रसिद्ध भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापुरात बांधला गेलेला भुईकोट किल्ला हे जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य. किल्लाबांधणी शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधला गेल्याचे इतिहासकार सांगतात. १६८५-८६ या काळात औरंगजेब सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ही नाणी आजही कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला. ( इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे १८१८ मध्ये झाली आणि मराठेशाहीचा अंत झाला.)

 अभयारण्ये

नान्नज येथीक माळढोक अभयारण्य

जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव) पक्षी अभयारण्य - ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. सोलापूर शहरातील कंबर तलावात (संभाजी तलाव) दुर्मीळ पक्षी येत असल्याचे येथील पक्षीतज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी यांनी अभ्यासले, तसेच त्यांनी नान्नज येथे माळढोकही शोधून काढला. कंबर तलाव हा सोलापूरचे एक फुफ्फुस आहे. येथे ६५ प्रकारचे पाणपक्षी असून, हिवाळ्यात येथे १४ जातींची रानबदके परदेशातून येतात. मध्य आशिया, सैबेरिया, चीन, युरोप येथून ही रानबदके येतात. ढोक, ढिबरा, कव्हेर जातीचे मासेही या तलावात मुबलकपणे आढळतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ कै. सलीम अली यांचे हे आवडते ठिकाण होते. याच तळ्याच्या परिसरात १४ उपवनांसह स्मृतिवनही तयार करण्यात आले आहे. आम्रवन, चंपक वन, अशोक वन, गणेश वन इत्यादी उपवने सामाजिक वनीकरण खात्यामार्फत विकसित करण्यात आली आहेत. हे स्मृतिवन देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

१९७९-८० मध्ये नान्नज (उत्तर सोलापूर तालुका) येथे माळढोक पक्षी अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. तीन फुटी उंची व २० ते २५ कि. वजनाचे माळढोक आज जगात फक्त सुमारे ५०० संख्येनेच उरलेले आहेत. त्यातील सुमारे २५ माळढोक नान्नज येथे आढळतात. जिल्ह्यातील माढा, मोहोळ व करमाळा हे तीन तालुके या अभयारण्यांतर्गत येतात.

solapur pune pravasi sangatana