किल्ले लिंगाणा

इतिहास :
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी आहेत ते फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा. मोर्यांचा पराभव केल्यावर शिवाजीने रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, एका वेळेस ५० कैदी ठेवत.  १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे होत. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाच्या रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती. लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली. रायगड नंतर लिंगाणा पडला. रायगडाच्या खोर्यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की आपण एका कोरडा हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायर्या आहेत ज्यावरती असलेल्या गुहांपर्यंत जातो. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जाण्यार्या वाटेवरूनच ही वास्तू दिसते. लिंगाण्याचे वैशिष्ट म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. आता थोडे याच्या इतिहासबद्दल जाणून घेऊ. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती म्हणजे या गोष्टी या साठी अतिशय अनुकूल आहे. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. गडाचे क्षेत्रफळ सुद्धा कमी, जवळ-जवळ २५० मी. उत्तरेस ज्या पायर्या आहेत त्या टाक्यांकडे नेतात. ती वाटही बिकट झाली आहे. आजमितीस ज्या टाक्यातून पाणी भरले जाते तिथे एक शिवलिंग आहे, ते कुठून आले हा प्रश्र्न पडतो.गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाण्यास प्रथम आपणास यावे लागते ते महाडला. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता गाडा आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचतो. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर आपल्याला घसरडा वाटेवरून आपण अर्ध्या तासात आपण लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो.
राहण्याची सोय : गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरडा वाटेवर थोडा पुढे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून ८ - ९ तास.



 

 


solapur pune pravasi sangatana