मध्य रेल्वेची पाचव्या दिवशीही बोंब!

03/01/2013 14:32

ठाणे। दि. २ (प्रतिनिधी)
ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेले यार्ड रिमॉडेलिंगचे बहुतांशी काम संपुष्टात आले असतानाच बुधवारी स्थानकातील सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. त्यामुळे धिम्या गती मार्गावरील अपच्या लोकल तब्बल सव्वा तासाच्या विलंबाने धावल्या. लाखो चाकरमान्यांना आजही लेट मार्कला सामोरे जावे लागले.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील सीएसटीच्या दिशेकडील सिग्नल यंत्रणा सकाळी ८.0२ ते सकाळी ८.२0 या कालावधीत ठप्प झाली होती. त्यामुळे दिवा-ठाणे मार्गासह कल्याण-दिवा मार्गावरील अनेक लोकल रांगेत उभ्या होत्या. या सर्व लोकल अप धिम्या गती मार्गावर उभ्या असल्याने या गाड्यांमधील हजारो प्रवासी ताटकळत होते.
रात्री उशीरापर्यंत हा खोळंबा कायम होता. सायंकाळच्या सर्व अप आणि डाऊन लोकलमधील प्रवाशी तब्बल एक ते दीड तास खोळंबले होते.

बंचिंग म्हणजे काय?
बंचिंग म्हणजे ‘जॅम’ होणे. रेल्वेच्या तांत्रिक भाषेत लोकल सेवेवर समस्या निर्माण झाल्यास एकामागोमाग एक लोकल उभ्या राहिल्यास त्यास बंचिंग असे म्हणतात.
आजची समस्या ही ठाणे स्थानकातील धिम्या गतीच्या अपच्या फलाटावरील सिग्नल यंत्रणेमुळे झाली होती. ही समस्या १८ मिनिटांची असली तरीही त्यामागोमाग येणार्‍या कल्याण-डोंबिवली ते ठाणेपर्यंतच्या लोकल सेवेचे बंचिंग झाले. धिम्या लोकल तासाभराच्या विलंबाने धावत होत्या.
- डीआरएम मुकेश निगम, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई


solapur pune pravasi sangatana
Make a free website Webnode