पुणे-सोलापूर इंटरसिटीवर दरोडा
पुणे-सोलापूर इंटरसिटीवर दरोडा टाकणा-या एका चोरट्याला पकडण्यात आलं होतं. मात्र, धक्कादायक बातमी अशी, की या पकडलेल्या दरोडेखोराला पोलिसांनीच सोडून दिल्याचं समोर आलंय. रेल्वे प्रवाशांनीच पोलिसांना या दरोडेखोराकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसवर दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय. दरोडेखोरांनी प्रवाशांना तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत त्यांच्याकडील किमती वस्तू पळवून नेल्या. पुण्याहून निघालेली इंटरसिटी ढवळस इथं क्रॉसिंगला थांबली होती. त्याचवेळी सुमारे दहा ते पंधरा दरोडेखोर रेल्वेच्या बोगीत घुसले आणि त्यांनी प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली. चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावून घेतले तसंच जबर मारहाणही केली. सुमारे 15 महिला प्रवाशांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत.
दरोडेखोरांच्या मारहाणीत तिघेजण जखमी झालेत. पोलीस घटनास्थळी पोहचण्याच्या आतच हे दरोडेखोर पसार झाले. रेल्वेच्या अधिका-यांनी जेव्हा घटनास्थळी भेट दिली तेव्हा प्रवाशी चांगलेच संतापले होते. चोरट्यांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्याने प्रवाशी चांगलेच संतापले होते.