निंबळक रेल्वे गेट परिसर बनले आत्महत्या केंद्र

08/11/2011 18:00

नगर - निंबळक रेल्वे गेट परिसर म्हणजे ‘सुसाईड स्पॉट’ बनले आहे. या भागात आत्महत्या करणा-यांचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्यांप्रमाणेच अपघातांचे प्रमाण जास्त आहे. येथील अरुंद गेट अपघातांना निमंत्रण देते.

नगर ते निंबळक या रेल्वेमार्गावर वर्षभरात किमान दहाजणांचा अपघाती मृत्यू होतो. यापैकी 5-6 घटना आत्महत्येच्या असतात. निंबळक रेल्वे गेट परिसरात गेल्या पाच वर्षांमध्ये 36 जणांनी आत्महत्या केली. नगर रेल्वेस्टेशन हद्दीत येणा-या दौंड ते मनमाड या दरम्यान 2009 मध्ये 62 जणांचा मृत्यू झाला. 2010 मध्ये 53 , तर 2011 मध्ये आतापर्यंत 20 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. यापैकी निम्म्या घटना या आत्महत्येच्या असून बहुतेक घटना निंबळक रेल्वे गेट परिसरात झाल्या आहेत.

सुमारे 12 हजार लोकसंख्या असलेले निंबळक गाव रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला वसले आहे. रेल्वेगेट क्रमांक तीसमधून ग्रामस्थ ये-जा करतात. पारनेर, भाळवणी, सुपा, इसळक, निंबळक, खातगाव टाकळी, जामगाव, निमगाव वाघा, हिवरेबाजार येथील ग्रामस्थांना एमआयडीसी व नगर शहराकडे येण्यासाठी हाच मार्ग आहे. कंपन्यांची वाहने याच मार्गाने एमआयडीसीमध्ये येतात. शहरातील अनेक व्यापा-यांची गोदामे एमआयडीसीमध्ये असल्याने त्यांचा माल घेऊन येणारी वाहने येथूनच जातात. त्यामुळे येथील रेल्वे गेटवर मोठा ताण पडतो. गाडीच्या आगमनाच्या वेळी गेट बंद केल्यानंतर दोन्ही बाजूला  लांबच लांब रांगा लागतात. गेट अरुंद असल्याने कोंडीत आणखी भर पडते. एकावेळी दोन मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. वाहनांचे एकमेकांना धडकणे, घासणे, वाहन उलटणे असे प्रकार घडतात. यात अनेकजण जखमी होतात. 

या परिसरात आत्महत्या करणा-यांचे प्रमाण जास्त असल्याचे ग्रामस्थ सांगतात. रेल्वेरुळांना संरक्षक कुंपण नाही, सतेच नजर ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकही नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रस्त झालेले अनेकजण रेल्वेखाली झोकून देऊन आयुष्य संपवतात.

*निंबळक गेट परिसरात होणा-या आत्महत्यांवर ब-याच अंशी नियंत्रण आले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये आत्महत्येचा एकही प्रकार घडलेला नाही. आम्ही या भागात अधून-मधून पेट्रोलिंग करीत असतो. - शिरपूर बी. बी., निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल

* रेल्वे रुळांवर अनेकदा आत्महत्या होतात. अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. अर्ध्या-अर्ध्या तासाने रेल्वे येत असल्याने गेट बंद करावे लागते. गेट बंद असले तरी लोक खालून घुसतात. गेट बंद करताना मध्ये येणा-या वाहनचालकांच्या डोक्यात ‘बूम’ पडल्याने दुखापती होतात. लोकांच्या दृष्टीने सिग्नलला शून्य किंमत आहे. येथील गोंधळामुळे एका गेटमनला जीव गमवावा लागला.


solapur pune pravasi sangatana