छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात प्रवाशांनी हार्बर गाडय़ा रोखल्या

14/12/2011 13:10
मुंबई, १३ डिसेंबर / प्रतिनिधी
altहार्बर गाडय़ांचे वेळापत्रक गेल्या एका आठवडय़ापासून विस्कळीत झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी आज रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात हार्बरच्या उपनगरी गाडय़ा रोखून धरल्या. या प्रकारामुळे केवळ हार्बरच नव्हे तर मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडल्याने घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा चांगलाच फटका बसला.
हार्बर मार्गावरील उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक गेल्या आठवडय़ापासून विस्कळीत झाले होते. गाडय़ांना सातत्याने विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांच्या सहनशीलतेचा अखेर अंत झाला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संतप्त प्रवासी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातच रूळांवर उतरले आणि त्यांनी पनवेल आणि अंधेरीला जाणाऱ्या दोन उपनगरी हार्बर गाडय़ा रोखून धरल्या.
या घटनेची खबर कळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली आणि संतप्त प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवासी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी थोडा बळाचा प्रयत्न करून रुळांवरील प्रवाशांना मागे सारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांना विनंती केल्यानंतर प्रथम पनवेलला जाणारी गाडी सोडण्यात आली.
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातूनच गाडय़ा सोडण्यात येत नसल्याने टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा मस्जिद येथेच थांबविणे अपरिहार्य ठरले. त्याचा फटका मध्ये रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांनाही बसला. या सर्व गोंधळात हार्बर आणि मध्य रेल्वेच्या गाडय़ांचे वेळापत्रक २० -२५ मिनिटांसाठी कोलमडले. रात्री उशिरा गाडय़ा वेळापत्रकानुसार सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  

solapur pune pravasi sangatana