रेल्वेवर दरोड्याचा डाव फसला, ‘आरपीएफ’कडून गोळीबाराच्या फैरी

22/06/2015 12:50
सोलापूर - सिकंदराबादहून-राजकोटलाजाणारी राजकोट एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पोफळज रेल्वे स्थानकावर लुटण्याचा प्रयत्न झाला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गाडीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी राऊंड फायर केल्याने दरोडेखोर पळून गेले. प्रत्युत्तरात दरोडेखोरांनीही मोठ्या प्रमाणावर गाडीवर दगडफेक केली. यात दोन प्रवासी आरपीएफचा कुमावत नावाचा कॉन्स्टेबल जखमी झाला. कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
 
राजकोट एक्स्प्रेस पोफळज रेल्वे स्थानकाजवळ क्रॉसिंगसाठी थांबली होती. अंधाराचा फायदा घेत १० ते १५ सशस्त्र दरोडेखोरांनी एस ११ डबा लुटण्याचा प्रयत्न केला. गाडीत चढण्याच्या प्रयत्नात असलेले दरोडेखोर पाहून प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. या वेळी गाडीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचा-याने दरोडेखोरांच्या दिशेने राऊंड गोळीबार केला. गोळीचा आवाज एेकताच दरोडेखोर पळाले. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

दरोडेखोर जखमी ?
पोफळज रेल्वे स्थानकावर राजकोट एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न झाला. आरपीएफच्या गोळीबारात दरोडेखोर जखमी झाल्याचा संशय आहे. डी.विकास, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ

solapur pune pravasi sangatana