योग अभ्यासात रमले सोलापूरकर

22/06/2015 12:40
सोलापूर- सूर्य उगवण्यास अजून अवकाश होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि तरुणी यांचे जथ्ये खुल्या मैदानांकडे निघाले होते. पांढऱ्या पोशाखातील या मंडळींच्या हातात बेडशीट, सतरंजी, चादरी होत्या. मैदानात एका समान रांगेत आसनस्थ झाले. मुख्य मंचावरून प्रात्यक्षिके सुरू झाली. त्यासरशी साऱ्यांनी योग प्रकारांना सुरुवात केली. हजारो लोक जमूनही गलबला नव्हता. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा आवाज मात्र स्पष्टपणे येत होता. सूर्याची कोवळी किरणे मैदानावर पडली. त्यानंतर उत्तम आरोग्याचे सूत्र घेऊन लोक मैदानाबाहेर पडले.
 
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी पहाटे शहरात हे चित्र होते. संपूर्ण सोलापूरच योगमय झाल्याचे पाहायला मिळाले.
 
पार्क मैदान, हरिभाई देवकरण प्रशालेचे प्रांगण, काडादी प्रशाला, कुचन प्रशाला आणि अन्य शाळांच्या मैदानांवर हा योग घडून आला. योगा शिकवणाऱ्या प्रशिक्षकांनी प्रत्येक आसनाची वैशिष्ट्ये सांगितली. त्याने कुठले रोग बरे होतात याची माहिती दिली. योग करण्यास वयाची अट नाही. कुठल्याही व्याधी असल्या तरी त्यावर याेगाच्या प्रकारांनी मात करता येते. परंतु त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. आंतराष्ट्रीय योग दिनाचा हा आैचित्य अाहे. नित्य करण्याची सवय लावून घ्यावी. त्याने आनंदी व्हाल, असा सल्ला त्यांनी दिला.
 
शिवस्मारकच्या प्रांगणात सकाळी जनता बँकेच्या कर्मचाऱ्यांचा योगाभ्यास झाला. सकाळी साडेदहानंतर शिवस्मारक सभागृहात आयोजित चर्चासत्रात शहरातील मान्यवर योगतज्ज्ञांनी योगशास्त्रावर आपले चिंतन मांडले. जिज्ञासूंची मोठी उपस्थिती होती.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अण्णप्पा काडादी प्रशालेतील योगाभ्यासात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी जैन आयुर्वेद महाविद्यालयातील कार्यक्रमातही सहभागी झाले.
सोलापूर हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास झाला. अर्पित कथ्थक नृत्यालयाच्या मनीषा जोशी सहकारी यांनी अनोखे सादरीकरण करून योग नृत्याच्या उत्तम मिलाफाचे दर्शन घडवले. डाॅ. शोभा शाह यांचे योग विषयावर व्याख्यान झाले. आमदार सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
मुख्याध्यापक ए. बी. जोशी, अध्यक्ष डॉ. गिरीश कुमठेकर, राजेंद्र काटवे, सत्यनारायण, योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. संतोष खराडे, प्रियंका खराडे, अरविंद, रूपा, अक्षया पेंडसे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. मण्णपूरम फायनान्सतर्फे ७०० पाणी पाऊचचे वाटप झाले. यावेळी विभागीय अधिकारी मुरली मुरगंपल्ली उपस्थित होते.
 
प्रारंभी सामूहिक प्राणायाम झाले. यासाठी पद्मासन, अर्धपद्मासन, सिद्धासन, वज्रासन आदी आसनांत बसता येते. कपालभातीच्या २० स्ट्रोक्सचे तीन आवर्तने घेण्यात आली. बैठक स्थितीतील बद्धकोनासन, शंशाकासन, अर्ध उष्ट्रासन, वक्रासन आदी योगासने झाली. यानंतर नाडीशुद्धी, भ्रामरी पार्श्वसंगीतासह ध्यान आदी प्रकार घेण्यात आले. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन आदी प्रकारांचाही समावेश होता. शयन स्थितीतील योगासनात सेतूबंध सर्वांगासन, पवन मुक्तासन, शवासन आदी प्रकार घेण्यात आले.
 

solapur pune pravasi sangatana