महाबळेश्वर

महाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासुन १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे.हे ठिकाण महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात आहे.

 

 पर्यटन

येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.

महाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.

येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.
महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाराष्ट्राचा काश्मीर म्हणूनही महाबळेश्वरला संबोधले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश-विदेश पातळीवर लौकिकास आले आहे. म्हणूनच येथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. राज्यात सध्या सर्वात जास्त पाऊस सातारा जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे येथील सृष्टी हिरवाईने नटली आहे. हा शृंगारलेला निसर्ग डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आणि पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी महाबळेश्वरला वाढू लागली आहे.

महाबळेश्वर-पाचगणी गिरीप्रदेश सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगांमधील एक भाग असून सिंदोला टेकड्यांमधील विल्सन पॉईन्ट हा देखील सर्वात उंच भाग आहे. पठाराच्या चहुबाजुंनी नद्यांची खोरी, विविध उंचीच्या सुळ्यांच्या डोंगराचा विशाल प्रदेश व येथील उभट डोंगर कड्यांचा भूप्रदेश ही या प्रदेशाची विशेषत: होय. या पठाराच्या पश्चिम व नैऋत्येकडील कोयनेचे आणि उत्तरेकडील कृष्णेचे विशाल खोरे भू स्वरुपाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.येथील मुख्य डोंगराचे खडबडीत उभट कडे व त्यातील खोऱ्यामुळे सह्याद्रीचे विशाल दर्शन घडते. डोंगराचा पूर्व आणि उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण डोंगरमाथा थेट कड्यापर्यंत विविध वृक्ष व वनराईने व्यापला असून येथील वनराई इतकी दाट आहे की उंचावरुन पाहिल्यास मोठ्या पर्णसंभासच्या लाटांचा भास व्हावा.

ऋतुपरत्वे महाबळेश्वमध्ये निसर्ग सौंदर्य बदलत असते. नैऋत्य मान्सून ओसरल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक सौंदर्य बहरलेले असते. बहुतांश भागावर वनफुलांचा गालीचा अंथरलेला असतो. वनराईच्या मोकळ्या जागा अरारुट आणि लिली फुलांनी भरुन जातात. येथील कडे, चकाकणारे असंख्य ओहोळ, फवारे, इंद्रधनु रंगीबेरंगी तुषारांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

महाबळेश्वर मंदिर प्राचीन असून यादव राजाने १३ व्या शतकात बांधले आहे. विल्सन पॉईंट, मारवारिया पॉईंन्ट, केल्स पॉईंन्ट, ईको पॉईंन्ट, आर्थर पॉईंन्ट, विंडो पॉईंन्ट, कसलरॉक पॉईंन्ट, सावित्री पॉईंन्ट, मार्जोरी पॉईंन्ट, एल्फिस्टन पॉईंन्ट, कॅनॉट पीक हंटर पॉईंन्ट, नॉथकोर्ट पॉईंन्ट, लॉडविक पॉईंन्ट, बॉम्बे पॉईंन्ट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फॉकलंड पॉईंन्ट, इत्यादी पॉईंन्ट पर्यटकांना भूरळ घालतात.

महाबळेश्वर जाण्याचा मार्ग

महाबळेश्वर पुण्यापासून 120, मुंबईहून 247 औरंगाबादहून 348 तर पणजी पासून 430 किलोमीटरवर आहे.




 

solapur pune pravasi sangatana
Make a website for free Webnode