कनकेश्वरचे पुष्पसौंदर्य
दिवाळीनिमित्त मिळणार्या सुट्टीत डोंगर-किल्ले भटकंतीचा एक नवा, चांगला ट्रेंड सध्या जोर धरुन आहे. पावसामुळे हिरवाई पांघरलेल्या निसर्गात मनसोक्त आणि निरुद्देश भटकणे हे निसर्गाबद्दल असणार्या मोहापाई लोकं करायला बघतात. यातही काही विशिष्ट आवडी-निवडी सांभाळणारा गट आहेच. गड किल्ले भटकंती करणारा गट, ट्रेकिंग व भ्रमंतीची आवड असणारा गट असतो. तसा तो इतिहासावर प्रेम करणाराही असतो. याच प्रमाणे पक्षी निरीक्षण करणारे, जंगल भटकंती करणारे, फुलांमध्ये रमणारेही असतात.
सध्या पावसाने सर्वत्र हिरवेगार होऊन नवीन फळाफुलांनी जोर धरला आहे. कासचे पठार, हॉली ऑफ फ्लॉवर सारख्या ठिकाणी फुलं पाहावयास जायचा नवा ट्रेंड सध्या आहे. पण रायगड जिल्ह्यातील कनकेश्वरला अनुपम पुष्पसौंदर्य लाभले आहे. याची जाणीव फारच थोडय़ांना आहे. कनकेश्वरच्या पुष्प सौंदर्यावर पुणे विद्यापीठात पीएचडी देखील करण्यात आली आहे.
कनकेश्वरच्या शिवमंदिराच्या ७०० पायर्यांचा डोंगर चढून जावे लागते. ही वाट खालच्या मापगावपासूनच सुरु होते. पण झिराडकडून जाणारी डोंगरातील किंवा कडय़ावरची वाट ही सोयीची व पुष्पसौंदर्याचा मनमुराद आनंद देणारी आहे. कारण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या दिवसातच तयार होते. हे सारे जंगल देवराई म्हणून राखले आहे. म्हणून ते अजूनही चांगल्या प्रकारे टिकून आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या वनस्पती वैभवाबरोबरच अनेक दुर्मिळ झाडे, फुले येथे पाहायला मिळतात. मात्र त्यासाठी पुरेसा वेळ काढून जायला हवे. वर मंदिर परिसरात चांगली धर्मशाळा असल्याने निवासाची सोयही होऊ शकते. येथे राहण्याचा उत्तम अनुभव घेतो येतो.
कनकेश्वरच्या डोंगरात या दिवसांत किंवा याच्या पुढे काही दिवसांत विविध प्रकारचे तेरडे, अनंत, पोह्याची फुले, तगर, बकूळ, गुलमक्षी, जास्वंद, झेंडू याखेरीज विरळ प्रमाणात का होईना गावठी गुलाब, रानगुलाब, मोगरा, सोनचाफा दिसतो. रोजच्या वापरात आपल्याला ज्ञात असणारी ही सुवासिक फुले आहेत. पण वेगळी दुर्मिळ फुलेही इथे आहेत. मुळात इथली पायथ्याची भातशेती आता हिरव्या रंगाने डोलत असते. खेरीज बाजूला अनेक तळी आहेत. त्यात विविध रंगांची कमळे डौलाने हसत असतात. या परिसरातील कमळांची विविधताही जाणकारांना मोहात टाकते.
इथे गुलमोहरासारखी फुले दिसतात. त्यांना अग्निशिखा म्हणतात. या फुंलाचा म्हणे कालिदासाच्या शाकुंतलमध्ये उल्लेख आहे. इथे गुलमोहरही खूप आहेत. खेरीज प्लॅटेंन्परो सुयास ऊर्फ भुई आमरी, चुबक काटा, निळसर, जांभळ्या फुलांची युट्रिक्युलॉरिया अशी बरीच फुले इथे आहेत.
स्मिनिया सोनपिवळी असते व तिच्यावर दोन ठिपके असतात. सोनकीही इथे आढळते. या सार्या फुलांचा या दिवसात सुंदर गंध पसरलेला असतो. देवदर्शनानिमित्त इथे अनेक भाविक येतात. पण परमेश्वरप्राप्तीच्या ओढीत निसर्गसौंदर्याचा स्वाद घ्यायला ते विसरुन जाण्याची शक्यता असते. त्यांना या फुलांच्या विविधतेची जाणीव करुन द्यायला हवी. छायाचित्रकार मात्र आपली हौस भागवून घेतात. काही चित्रकारही इथे आलेले दिसतात.
फुले म्हटली, की पाठोपाठ अनेक प्रकारचे पक्षी, किटक व फुलपाखरेही आलीच. इथे फिरताना कुणी जाणकार सोबत असल्यास तो सारे वैशिष्ट्यपूर्णरीतीने समजावून सांगतो. देवराईमुळे आंबा, किंजळ, सागासारखे प्रचंड वृक्ष व सरपटणारे प्राणीही येथे वास्तव्यास आहेत.
याखेरीज या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या पिकतात. टाकळा, मारंगी कर्टली, पेंढरी या सर्व रानभाज्या इथे खूप मोठय़ा प्रमाणात होते. या भाज्या आपण शहरात पाहिलेल्या व खाल्लेल्या असतात. पण त्या हिरव्यागार, सजीव अवस्थेत पाहणं हा एक गमतीदार अनुभव असतो. या सार्या भाज्या औषधी असतात. परंपरेने त्याचे उपयोग सार्यांना माहित असतात.
समोर मोठा खत कारखाना असूनही कनकेश्वर अजूनही बराचसा टिकून राहिला आहे. फरशी जंगलतोड वा डोंगरावर आक्रमण झाले नाही. त्यामुळे अजूनही आपण त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो.