किल्ले पुरंदर

 

किल्ल्याची उंची : १५०० मीटर    

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांगः पुणे

जिल्हा : पुणे  

श्रेणी : सोपी 

 

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाटावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्र्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याला चौफेर माच्या आहेत. किल्ल्याचे स्थान १८.२८ अंश अक्षांश व ७४.३३ अंश रेखांश वर स्थित आहे. किल्ला पुण्याच्या आग्रेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

इतिहास : अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा । असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे असे अनुमान निघते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकण्ठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते. ‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’ मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, ‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो.’ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोन नीट खानावरी चालिला. खानावरी तलवरीचा वार करावा तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’ खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना ावे लागले. त्यांची नावे अशी, १. पुरंदर २. रुद्रमाळ किंवा वज्रगड ३. कोंढाणा ४. रोहीडा ५. लोहगड ६. विसापूर ७. तुंग ८. तिकोना ९. प्रबळगड १०. माहुली ११. मनरंजन १२. कोहोज १३. कर्नाळा १४. सोनगड १५. पळसगड १६.भंडारगड १७. नरदुर्ग १८. मार्गगड १९. वसंतगड २०. नंगगड २१. अंकोला २२. खिरदुर्ग (सागरगड) २३. मानगड ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.

बिनी दरवाजा : पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेक-यांच्या देवडा आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. माचीची एकंदर लांबी एक मैल आहे, तर रुंदी १०० ते १५० फूट आहे. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते त्याचे नाव’पुरंदरेश्र्वर’.

रामेश्र्वर मंदिर : पुरंदरेश्र्वर मंदिराच्या मागील कोप-यात पेशवे घराण्याचे रामेश्र्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाडांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्र्वनाथाने तो बांधला. या वाडातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाडाच्या मागे विहीर आहे. आजही ती चांगल्या अवस्थेत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. आपण प्रथम बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाऊया. यावाटेने वर गेल्यावर १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाजापाशी पोहचतो.

खंदकडा : या तीस-या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो हाच तो खंदकडा. या कडाच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तीस-या दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजुबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखाना असल्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाडाचे अवशेष दिसतात. हे सर्व पाहून पुन्हा आपल्या वाटेला लागावे. वाटेवरून पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जातांना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडी मुळे आज हा दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी या दरवाजाला फार महत्त्व होते.

पद्मावती तळे : मुरारबाजींच्या पुतळ्या पासून थोडे पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.

शेंद-या बुरूज : पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे त्याचे नाव शेंद-या बुरूज. पुरंदरेश्र्वर मंदिर : हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटापर्यंतची मूर्ती आहे. हे मंदिर साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. दरवाजा ब-यापैकी सुस्थितीत आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजवी कडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुस-या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. याशिवाय या भागात बघण्यासारखे काही नाही. आल्या मार्गाने दिल्ली दरवाज्यापाशी यावे. समोरच उजवी कडे असणा-या दरवाज्याने पुढे जावे. येथून पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. या दरवाज्यावर दोन्ही बाजूस सिंहाच्या प्रतिकृती आढळतात. केदारेश्र्वर : २० मिनिटात केदार दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागू शकतो. यावाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायया लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्र्वराच्या मंदिरा पर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्र्वर. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्र्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युध भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्र्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे. पुरंदर माची : आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणा-या वाटेने थेट पुढे यावे. म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहचतो. वाटेत वाडांचे अनेक अवशेष दिसतात. भैरवखिंड : याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून चालत गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.

वीर मुरारबाजी : बिनीदरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो. पुरंदर सोबत वज्रगड देखील पहायचा असल्यास दीड दिवस लागतो.

गडावर जाण्याच्या वाटा : पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

१) पुण्याहून : पुण्याहून ३० कि.मी अंतरावर असणा-या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एस.टी सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडी रस्ता थेट किल्ल्या पर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहे. एक म्हणजे गाडी रस्ता. या रस्त्याने गड गाठण्यास २ तास पुरतात तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनीदरवाज्यापाशी पोहचतो

२) सासवडहून : किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट जरा आडमार्गाची आहे. सासवडहून सासवड – भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणा-या ‘पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणा-या सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.

राहण्याची सोय : किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्‍या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून १ तास.

  


solapur pune pravasi sangatana