हरिहरेश्वर - दक्षिणकाशी

हरिहरेश्‍वर हे रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील शेवटचे गाव. येथील सुंदर डोंगर समुद्राने वेढलेला आहे. एका बाजूला बाणकोटची खाडी व दुस-या बाजूला अरबी समुद्र असे नयनरम्य दृश्य इथे पहायला मिळते. येथे पूर्वजांची क्रियाकर्मे केल्यास त्यांना गती प्राप्त होते असे बोलले जाते. म्हणून त्याला दक्षिणकाशी असेही म्हणतात. समुद्रात घुसलेल्या या गोलाकार टेकडीला प्रदक्षिणा घालता येते. ओहोटीच्या वेळी हा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण खुला होतो.

या टेकडीवर बसून समुद्राची गाज ऐकण्याची मजा काही औरच आहे. इथे हरिहरेश्‍वरचे व कालभैरव महाराजांचे मंदिर आहे. धार्मिक वातावरणाबरोबरच अस्सल निसर्गसौदय पहायचे असेल तर इथेच यायला हवं. श्री. हरिहरेश्‍वर मंदिर ट्रस्टने माहितीपूर्ण पुस्तिका केलेल्या आहेत. हरिहरेश्‍वर क्षेत्र व परिसर या विषयीची पौराणिक माहिती करून घेण्यासाठी या जरूर घ्याव्यात.

या ठिकाणचा समुद्र अतिशय धोकादायक आहे. तीर्थक्षेत्र मानल्या गेलेल्या डोंगराला प्रदक्षिणा घालताना हा मार्ग समुद्रात घुसलेला आहे. स्थानिक जाणकारांकडून भरती ओहोटीच्या वेळा व प्रदक्षिणा मार्गाची नीट माहिती करून घ्यावी म्हणजे समुद्राची मजा अधिक अनुभव येईल.

हरिहरेश्‍वरला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा दिला आहे. व पर्यटकांची राहण्याची सोय केलेली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे हरिहरेश्‍वर येथे असलेले तंबू निवास व बंगले पर्यटकांना खास आवडते ठिकाण आहे. वेळासची खाडी आणि हरिहरेश्‍वरचा समुद्रकिनारा ह्यामध्ये समुद्रात घुसलेल्या एका टेकडीवर हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे. रहाण्या-जेवण्याची उत्तम सोय येथे उपलब्ध आहे. मग जाणार ना... हरिहरेश्‍वरला?

 


solapur pune pravasi sangatana