वालावलचा लक्ष्मीनारायण !

 

वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारे टोक. गावाच्या उत्तरेला पाट-चेंदवण सीमा जोडलेल्या आहेत. समृद्ध हिरवागार वालावल आणि त्याची भावंडे शोभणारी चेंदवण, हुमरमाला, गावधड ही वाडीवजा गावे.. निसर्गसंपदा आणि वन्यप्राणीही या पंचक्रोशीत भरपूर आहेत. वालावलचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ज्यांभ्या दगडाचे कातळी क्षेत्र. या कातळीने वालावल गावाची 30 टक्के जमीन व्यापली आहे. डोंगराळ भागात असूनही वालावल हे नदीच्या किना-यालगत असल्याने पर्यटकांना लागणारा भाजी-पाला, शेती, फळं आदि कृषी उत्पन्न हे इथल्या मातीत पिकवलं जातं. सिंधुदुर्गातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं वालावल गाव हे पर्यटन विकासाच्या दृष्टीने फार मोठय़ा आघाडीवर असणारं गाव आहे.

वालावलचा लक्ष्मी नारायण हे एक जागृत देवस्थान तर आहेच, शिवाय नारायणाची प्राचीन मूर्ती व मंदिर हा वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम नमुना आणि अमूल्य ठेवा आहे. हे नारायणाचे शिल्प आठव्या शतकातील चालुक्य कालीन आहे. अशाच दगडात कोरलेली व नारायणाच्या मूर्तीची समकालीन व या शिल्पाशी बरेचसे साम्य असलेली दुसरी एक मूर्ती महाराष्ट्रात उपलब्ध आहे, ती म्हणजे पंढरपूरच्या विठोबाची! या मूर्तीचा दगडही काळा रेतीमय आहे. दोन्ही मूर्ती आठव्या शतकातील असल्याचा निर्वाळा तज्ज्ञ देतात. श्री देव नारायणाच्या व विठोबाच्या मूर्तीत जसे साम्य आहे, तसेच दोन्ही देवस्थानच्या उत्सावांतही साम्य आहे. दोन्ही देवस्थानांचे एक अतूट नाते आहे. श्री देव नारायणाची तुळशीमाळा घेऊन पंढरपुरात जाऊन विठोबास वाहण्याचा व विठोबाचा बुक्का नारायणास अर्पण करण्याचा प्रघात असून त्या कामासाठी जमीन इनाम दिलेली आहे.

मात्र वालावलच्या ग्रामस्थांनी पंढरपुरास जाऊ नये असा दंडक आहे; कारण नारायण हे विठ्ठलरूप आहे. गावाला‘दक्षिण पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. इथले सर्व ग्रामस्थ नारायणाला विठ्ठल समजूनच त्याची भक्तीभावाने पूजा करतात. हे गाव म्हणजे संतांची मायभूमी. गावातील ग्रामस्थ कित्येक वर्षापासून कधीही पंढरपूरला गेलेले नाहीत. एवढेच नव्हे तर इतर गावातील कुठल्याही यात्रेला न जाणारे ग्रामस्थ या गावात मोठय़ा संख्येने येतात. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले की शिक्षा मिळते. गाडी बंद पडते, नाही तर गाडीला अपघात होतो, असा अनेकांना अनुभव असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे ते पंढरपूला विठ्ठल दर्शनासाठी कधीच जात नाहीत!
 
लक्ष्मी नारायण तलाव
लक्ष्मी नारायण मंदिराशेजारी हा तलाव असून याची खोली 40 फुटांपर्यंत आहे. या तलावाकडून पाणी जाण्याच्या तीन वाटा आहेत, त्यापैकी मुख्य दरवाजा भक्कम बांधकाम केलेला आहे. या तलावासमोरच आज वालावल ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. या तलावाचे पाणी सुमारे 200 एकर जमिनीसाठी पुरते. रामनवमीनंतर या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. तलावाच्या पायरीवर एक शंकराची पिंडी व पाषाणमूर्ती आहे. तलावाचे पाणी कधीही खराब होत नाही, असा लौकिक आहे. या पाण्याला तीर्थाप्रमाणे मान आहे. हा देव सदा जागृत आहे. या रम्य तलावाला शेतीसाठी उपयुक्ततामूल्य आणि आता पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असल्यामुळे वालावल गावात सारे काही आलबेल आहे.
 
माउली माता मंदिर
वालावल चेंदवण गावाची ग्रामदेवता आणि ‘नवसाला पावणारी, हाकेसरशी भक्तांच्या मदतीला धावून येणारी देवी’ अशी ख्याती असलेल्या तळकोकणातील सुप्रसिद्ध श्री देवी माउलीचे मंदिर भव्य आणि देखणे आहे. देवीची पाषाणातली आकर्षक मूर्ती चार फूट उंचीची आहे. ही जगदंबा माउली म्हणजे आग ओकणारी दृढ शक्ती आहे. तिचे तेज गावाला सहन होणारे नाही म्हणून ती दोन्ही गावाच्या कडय़ाकपारीच्या डोंगरात उभी आहे. देवीला दहा हात असून, शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, ढाल, तलवार, अग्नी, कुंठ आदि आयुधे घेऊन ती दशहाती उभी आहे. ही देवी ‘मूळ माया’ किंवा मायेची पूर्वज म्हणून ही ओळखली जाते. देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री देवी माउलीच्या समोर जी घुमटी आहे, तेथे देवीचा आज्ञांकित मोठा मुलगा घोडय़ावर बसून हाती बाण, भाला घेऊन परचक्र दोषहवन प्रीत्यर्थ उभा आहे. त्याच्या हातात संपूर्ण बारा आधिपत्यस्वरूपी (कुळाचार) आहेत आणि तो माउलीच्या हुकुमांची वाट पाहतो आहे, असे सांगतात. शिवलिंगाच्या समोर नंदी असतो, त्याप्रमाणे माउलीच्या समोर ही मूर्ती आहे.
 
उत्तरेला कर्ली खाडी किनारा लाभलेला आहे. त्यासमोर एक विस्तीर्ण असे बेट दृष्टीस पडते. वालावलच्या जुवा बेटाच्या चारही बाजूला नदीचे खोल पाणी व आतमध्ये हे बेट आहे. नारळ, पोफळीच्या मोठय़ा बागा, अधूनमधून दिसणारी केळीची झाडे व त्यामध्ये दिसणारी कौलारू घरे पाहून आपण भारतातील एका पारंपरिक खेडय़ात येऊन पोहोचल्याची जाणीव होते. जोरात वाहणा-या वा-याबरोबर इथली नारळी, पोफळीची उंच झाडे जमिनीला वाकुल्या दाखवतात! या खाडीचे पाणी फेब्रुवारीमध्ये खारे होते, तोपर्यंत शेतीसाठी वापर केला जातो. या खाडीमध्ये मासेमारी व वाळू काढण्याचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. या खाडीतून गलबताद्वारे व्यापारही केला जाई. आजही नेरूरपार येथे पूल उंच बांधण्यात आलेला आहे; कारण कदाचित पुढे हा मार्ग चालू झाल्यास अडथळा होऊ नये, इतका हा परिसर निसर्गरम्य असा आहे. त्यामुळे ‘चानी’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या परिसरात करण्यात आलेले आहे. येथे विविध प्रकारचे पक्षी पहाण्याची संधी पर्यटकांना मिळते. होडीतूनही या बेटाला फेरफटका मारता येतो.
 
गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. वालावल गावात जसं मनाला भुरळ पाडणारं सौंदर्य आहे, तसंच कोकणाची नैसर्गिक रचना विलोभनीय आहे. पंचक्रोशीचा ‘कुपीचा डोंगर’ वालावल गावाच्या पश्चिमेस आहे. बोलका पत्थर, सिद्धाचा खडक, पाण्याचे रान, वाघाची गुहा यामुळे तो प्रसिद्ध आहे. या डोंगरामुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण होते. डोंगरावरून पाहिल्यास, उंचावर असल्यामुळे स्वच्छ समुद्रकिनारे, मजबूत तटबंदी असलेले किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला, धामापूरचे तलाव, कर्ली खाडी, कर्ली खाडीवरील पूल दृष्टीपथात येतात. निवती भोगवे समुद्रातील मच्छिमार या कुपीचा डोंगर दगडाचा उपयोग निशाण म्हणून करतात. या दगडाकडे जायला माउली मंदिराकडूनही रस्ता आहे. शेजारी धनगर वस्ती असल्यामुळे या परिसरात माणसांची वर्दळ असते. ‘कुपीचा डोंगर बचाओ आंदोलना’मुळे हे निसर्ग सौंदर्य अजून टिकून आहे.
 
कसे जाल?
जवळील रेल्वे स्टेशन- कुडाळ
येणा-या रेल्वे गाडय़ा- सीएसटी-कोकणकन्या, सीएसटी- मांडवी मडगाव, सीएसटी-जनशताब्दी, दादर-मत्सगंगा एक्स्प्रेस.
येथील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ- नारळपाणी, खाजा, काजूगूर, बंदी लाडू, कोकम, आगुळ, धीवर आणि कांदा भजी.
स्थानिक वाहन- ऑटो रिक्षा, सहासीटर, सुमो.

 

solapur pune pravasi sangatana