भुलेश्वरचा शिल्प खजिना

पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर. प्राचीन हेमाडपंथी मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून हे ठिकाण भटक्यांमध्ये ओळखले जाते. हा पूर्वी एक लहानसा किल्ल होता. दौलत-मंगलगड त्याचे नाव.

पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह संपन्न झाला. अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली म्हणून हे ठिकाण भुलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.

भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवत जवळ यावे. यवतच्या अलीकडेच एक उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरस कडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून गेलात की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर जायचे. जुन्या टेलिफोन मनो-याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे. बाहेर असणा-या झाडावर अनेक पोपट आणि घुबड हमखास दिसतील. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पाय-या चढून गेल्यावर एक लहान दरवाजा आहे.

आत प्रवेश केल्यावर विशेष असे काही दृष्टीस पडणार नाही आणि थोडा भ्रमनिरास होईल. पण आत अजून एक लहानसा दरवाजा आढळतो. त्यातून आत गेले की दोन्ही बाजूंना जाणारे दगडी जिने आहेत. त्यांवरुन आपण मुख्य बंदिस्त मंदिर वास्तूत प्रवेश करतो. आणि आजूबाजूचे दृष्य हरखून टाकते. पुरुषभर उंचीचा नंदी, त्यावर एक दगडी मंडप, जिथे नजर जाईल तिथे अप्रतिम कोरीवकाम केलेली शिल्पे. हे सर्व वास्तूशिल्प लहान दरवाजाच्या आड लपवून परकीय आक्रमणापासून वाचवण्याची बुद्धिमत्ता मंदिर निर्मात्याने योजिली आहे. काही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. पण आजही त्यांचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही.

धीरगंभीर पवित्र वातावरणात मुख्य गर्भगृहात पिंडीवर सतत अभिषेक चालू असतो. दर्शनानंतर मंदिर सौंदर्य पहायला सुरुवात केली की आपली नजरच ठरत नाही. पहाल तिकडे मोहक, रेखीव शिल्पांची जादुई नगरीच. महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी असणारे स्त्री-गणेशाचे शिल्प या ठिकाणी आहे. प्रत्येक शिल्प आणि खांब न्याहाळून पाहताना, त्याच्या निर्मात्या हातांना आपण आपोआपच नमन करतो.

तर मग कधी जाताय भुलेश्वरला?

 

 

solapur pune pravasi sangatana