अणावची पांडवकालीन गुंफा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयापासून तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या पणदूर तिठय़ापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर कुडाळ तालुक्यातील अणाव येथील भाभगिरी डोंगराच्या गर्द जाळीत एक गुंफा आहे. ही गुंफा म्हणजे सहा-आठ फुट रुंदीची एक खोलीच पुर्ण जांभळ्या दगडात पुरातनकाळी कोरलेली आहे. ती पांडवकालीन असल्याचे सांगण्यात येते. भाभगिरी डोंगर घनदाट झाडीने व्यापलाय त्यातच त्या डोंगरावरच्या माथ्यावर एक पांडवकालीन गुफा या गुफेमध्ये पुर्वीच्या काळी गिरीबुवा नावाचा एक साधुपुरुष वास्तव्य करत होता. काही कालावधीनंतर या साधुपुरुषाने या गुफेमध्येच समाधी घेतली. या साधुपुरुषाच्या नावावरुन या डोंगराला भाभगिरी हे नाव पडले. पुरातन काळाची साक्ष देणारे अवशेष किंवा सदृश स्थिती या ठिकाणी आढळून येते. या साधुपुरुषाने समाधी घेतल्यानंतरची पादुकासदृश एक वीट आढळून येते. दिवाबत्ती करण्यासाठी दगडाच्या खाचीत कोंदण केलेले आहे. समाधीच्या मागील दोन्ही बाजूस दोन समांतर उभे खाच मारलेले आहेत. वर माथ्याला दोन्ही बाजूला तीन तीन गोल छिद्रे पाडलेली आहेत. आश्चर्य म्हणजे भल्या मोठय़ा आकाराच्या जांभळ्या दगडामध्ये त्याकाळी कठीण काम कोणत्या हत्याराने केले असावे याचा अंदाज घेता येत नाही.
त्या काळाचा विचार करता ही एक वैशिष्टपूर्ण गुफा या डोंगराच्या गर्द झाडीत आढळून आली आहे. जेव्हा शिकारी या डोंगरात शिकारीसाठी जातात. तेव्हा गिरीबुवाला नवस बोलला जातो. आणि शिकार प्राप्त झाल्यानंतर त्याला विडी (कुडाच्या पानात तंबाखुचा चुरुट) ठेवली जाते.
या डोंगराच्या मध्यभागी खडकाच्या मध्यावर अष्टय़ाचे झाड उगवले आहे. म्हणून हा खडक अष्टाचा खडक म्हणून ओळखला जातो. सदर गुफा जंगली प्राण्यांची आश्रयस्थान झाली आहे. अणाव -दाभाचीवाडी येथे पांडवांचे खडक आज पांडवकालीन काळाची साक्ष देत आहेत.

अणाव येथे भंगसाळनदी, पीठढवळ व कर्ली नदी या तीनही नद्या एकत्र येऊन मिळाल्याने येथून कर्ली नदीचा उगम झाला आहे. हे ठिकाण तिसग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या क्षेत्राला पर्यटनदृष्टय़ा खूप महत्व आहे. ही सर्व माहिती पिंगुळीचे अनिल ढोंबरे पर्यटक मार्गदर्शक सांगत होते. प्रत्यक्ष गुफा पाहतांना प्रत्येक क्षणी आठवण येत होती ती अजिंठा-वेरुळची. त्याच कलाकुसरीचे संदर्भ येथे दिसत होते. कारागिरांनी दगडावर केलेली कामगिरी पाहून त्या वेळची परिस्थिती, पोहचण्याचा मार्ग, वापरात आणलेली हत्यारे अंदाजाने डोळ्यासमोर येत होती.

तास दिड तास परिसरात घालविले. भूक लागली होती. मन निघायला तयार नव्हते. शेवटी निघालो. एक चांगली सफर झाली. कार्यालयात आल्यानंतर माहिती घेतली. जिल्हा परिषदेने पर्यटन स्थान म्हणून या ठिकाणचा समावेश केला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने देखील संशोधन सुरु केलं आहे. तुम्हीही या ठिकाणी जरूर भेट द्या.
 

 


solapur pune pravasi sangatana