चांदोली

 पुष्कळ दिवसापासून चांदोली बद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्षात जाण्याचा कधी योग मात्र येत नव्हता. भटकंतीची तर मला आवडच आहे. आमच्या मित्रमंडळीमध्ये नेहमीच चर्चा चालते ती भटकण्याची. कोल्हापूरचा परिसर तर तेथील वास्तव्यात फिरुन झाला आहे. आता सांगलीला आगमन झाल्यावर या परिसराविषयी माहिती घेत असताना चांदोली संदर्भात वाचनात आले मग आमच्या कंपूने चांदोलीला जाण्यात बेत ठरवला.
 

यंदा पावसाळा लांबल्याने सर्वत्र हिरवाई दाटली आहे. अशा या रम्य पावसाळी वातावरणात चांदोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजा काही औरच आहे. चांदोलीला जाण्यासाठी रिमझिम पावसातच आम्ही बाईक वरुन निघालो. सांगलीपासून साधारणपणे १२० किमी. अंतर आहे चांदोलीचे. रस्ताही तसा चांगलाच आहे आणि पाऊस अंगावर झेलून बाईकने जाण्याचा आनंद तर काही औरच आहे. शब्दात तसं सांगणं कठीणच. रमत गमत, पावसात भिजत साधारणपणे दीड दोन तासातच आम्ही चांदोलीला पोहोचलो.

                                                      विविध वन्यजीव, प्राणी, पक्षी, अथांग असा पसरलेला वसंतसागर जलाशय, हिरव्या गर्द झाडीने एखाद्या नववधू प्रमाणे नटलेल्या चांदोली अभयारण्यात प्रवेश करताच आमचा प्रवासाचा थकवा गायब झाला. शनिवार- रविवार जोडून सुट्टी असल्यामुळे चांदोली परिसर थोडासा गजबजलेला होता.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला ३१७.६४ चौ.किमी. क्षेत्रात चांदोली अभयारण्य विस्तारले आहे. १९८५ मध्ये चांदोली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळून २० वर्षे झाली असून नुकताच सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा दर्जा या परिसराला देण्यात आला आहे. हिरवीगार घनदाट अशी वनराई सह्याद्रीचे उंच उंच एकमेकांशी स्पर्धा करणारे असे डोंगर, दुर्मिळ पशुपक्ष्यांचा येथे असलेला राबता आणि मुख्य म्हणजे येथील प्रदुषण रहित असे मनाला आनंद देणारे, उल्हसित करणारे वातावरण पाहून मन कसं अगदी खुश होऊन जातं.

वाघाचं दर्शन होणं तसं जरा कठिणच, पण हरणांच्या कळपाचं बागडणं आणि वनात आमच्या समोरुन त्यांचा गेलेला कळप पाहताच माझ्या डोळयासमोर ऍनिमल प्लॅनेटवरची दृश्य तरळली. अभयारण्यात फेरफटका मारण्यासाठी आम्ही आमच्या गाडया कार्यालयाच्या बाजूला उभ्या करुन वनाधिकार्‍यांची परवानगी घेवून मनमुराद भटकण्यासाठी पायीच निघालो. अभयारण्याच्या आसपास असलेल्या शेतकर्‍यांची कामाची लगबग सुरु होती. कोण हे अनामिक म्हणून क्षणभर नजर टाकून ते परत कामाला लागत होते.

पायी चालत चालत आम्ही वसंतनगर जलाशयानजीक आलो. संथ वाहणारे पाणी, त्या पाण्यावर आपले खाद्य टिपण्यासाठी जमलेले पक्षीगण त्यांचे थवे पाहून आमच भानच हरपून गेले. असंख्य जातीचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. निसर्गाची मुक्तपणे केलेली ही उधळण, पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, कानात साठवून पुढे निघालो.

येथील पर्जन्यमान हे ३ ते ५ हजार मि.मी. इतके आहे. यामुळेच हा परिसर नेहमीच हिरवागार असा राहतो अशा या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही वाटचाल करु लागलो. वाटेत डोंगरावरुन खाली येणारे पाणी, दगड-धोंडे तुडवत चालण्याचा आनंद घेत पुढे जात असताना पक्ष्यांची किलबिल ऐकून आमचा प्रवासाचा ताण नाहीसा होत होता. पुन्हा पुन्हा कानात साठवावी आणि परिसरातील हिरवाई कॅमेरात बध्द करावी अशी प्रबळ इच्छा होत होती. काय काय म्हणून टिपावे तेच समजत नव्हते. एवढा फुलोरा इथे दिसून आला. निसर्गाची ही मुक्त उधळण पाहून आमचे मन अगदी प्रसन्न झाले.

हे अभयारण्य १ ऑक्टोवर पासून पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. अगदी नाममात्र असे याचे शुल्क आहे. मात्र येथे अग्नी पेटवण्यास बंदी आहे. हौशी प्रवाशी मुक्त वातावरणात भोजनाचा आनंद लुटावा म्हणून धरणाच्या पायथ्याला म्हणजेच नदीच्या काठावर तीन दगड मांडून चूल पेटवून आपली क्षुधा भागवतात. त्यामुळे येथे हे दृश्यही पाहून एक वेगळाच अनुभव आपणाला येतो. जंगलातून अशी भटकंती करत असताना तिन्ही सांज कधी झाली तेच कळत नाही. जंगलातून गावकरी आपली गुरे घरी परत घेवून जात असताना पाहून आम्हालाही परतीची जाणीव झाली. चांदोलीतील नटलेली हिरवाई फुललेली रान फुले, फुल झाडे यांची दृश्ये मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

आपणही या परिसरात या. मनमुराद भटकण्याचा आनंद लुटा. चांदोली आपल्याला साद घालत आहेत. सांगलीहून जाण्यासाठी एस टी च्या तसेच खाजगी गाडया येथे उपलब्ध आहेत. खाजगी उपहारगृहेही येथे आहेत. तर मग नेहमीची चाकोरी सोडून एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तरी या. चांदोलीला, आपले स्वागत

solapur pune pravasi sangatana