नागझिरा

 

‘केल्याने देशाटन येतसे मनुजा चातुर्य अन् शहाणपण’लहानपणी पाठ केलेल्या कवितेच्या ओळी माझ्या ओठावर सहजगत्या आल्या. नागझिरा अभयारण्याच्या वनवैभवात फिरताना नुकतीच वैशाख पोर्णिमा आटोपली होती. अभयारण्यास भेट देण्याचा मौसम संपत आलेला असताना वनाधिकारी एम.के. कुलकर्णी यांच्या समवेत अचानकपणे नागझिरा भेटीचा योग आला.तसा यापूर्वी मेळघाट-नागझिरा-नवेगाव बांध-पेंच-ताडोबा या जंगलामधून वेगवेगळया निमित्ताने थोरा-मोठयांना सोबती म्हणून फिरण्याचे अनेक योग आले. पण उपवनसंरक्षक किंवा वनाधिकारी यांच्या समवेत फिरताना वेगळीच मौज असते. सहज होणार्‍या गप्पागोष्टीसोबत क्षणोक्षणी अनोळखी असणारं जंगलाचं पान् अन् पान बोलत होतं माहितगार होतं. आपल्या ज्ञानात भर पडते.

माझंही असचं झालं होतं.नागझिरा वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कुलकर्णी साहेब मला सांगत होते. महाराष्ट्राच्या पूर्व भागात असलेल्या गोंदिया जिल्हयाच्या हया अभयारण्याचे क्षेत्रफळ १५२.८१ चौरस किलोमिटर असून जंगलातल कक्ष क्रमांक १११ चे स्थान सर्वात उंच असून ते ५१४ मीटर उंच आहे. या ठिकाणी वीज नसल्यामुळे अभयारण्यास अंत्यत शांत आणि मन प्रसन्न करणारे नैसर्गिक वातावरण लाभले आहे.

नागझिरा अभयारण्याची वर्गवारी उष्ण कटिबंधीय (दक्षिण विभाग) शुष्क पर्णगळीच्या वनांमध्ये करण्यात येते. येथील तापमान किमान ६ डिग्री सेल्सिअस पासून कमाल ४१-४२ डिग्रीपर्यंत तापमान असते.नागझिरा या शब्दाचा देवनागरी मधला अर्थ होतो. हत्तीचा पाणवठा. संस्कृत भाषेत नाग हे हत्तीचे एक नाव आहे. झिरा म्हणजे पाणवठा. त्यामुळे फार पूर्वी येथे हत्तींचे वास्तव्य असावे असे वाटते. हत्तीच्या वास्तव्यासाठी घनदाट आणि जैविक विविधतेने नटलेले जंगल असावे लागते. नागझिरा-नवेगाव येथील जंगल असेच समृध्द जैविक विविधतेने नटलेले आहे. फार पूर्वी येथे हत्तीची वसाहत असावी असे संकेत आढळून येतात.

या अभयारण्यात आढळून येत असलेल्या जैविक विविधतेमध्ये साग,एîन,बिजा,साजा,जांभूळ,कर्‍हू,सालई, तेंदू,अमलताश,अर्जून सेमल,चारोळी,आवळा,उंबर,कुसुम,बांबू,वड व पिपंळ या अमरकोशातल्या वृक्षासोबत भूसभूसी, धोनाड, मुसान, हर्रा, शेडा, खस, कसर आदी गवतांच्या प्रजाती मोठया प्रमाणावर आढळतात. या प्रजातीमध्ये आयुर्वेदीयदृष्टया अनेक वृक्षप्रजाती औषधी वनस्पती मध्ये येतात. याशिवाय पळसवेल, एरौनी, माहूर सेना, काचकुरी, चिलाटी आदी वेलीच्या प्रजाती पण आहेत.

शिकारीला बंदी असल्यामुळे येथीलही जीवसृष्टी/प्राणसृष्टी विविधांगाने बहरली आहे. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या ३४ आणि सरपटणार्‍या प्राण्यांच्या ६ प्रजाती आहेत. पक्ष्यांच्या १६७ प्रजाती असून फुलपाखरांच्या ५० प्रजाती आढळतात. याशिवाय अनेक प्रकारचे किटक आढळत असून किटकशास्त्रांमध्ये संशोधन करता येईल येवढया वैविध्यपूर्ण किटकांच्या प्रजाती या अभयारण्यात आढळतात.

सस्तन प्राण्याच्या मध्ये बिबट, वाघ, रानगवे, सांबर, चितल, नीलगाय, अस्वल, चांदीअस्वल, चौसिंगा, तडस कोल्हे-लांडगे, रानकुत्रे, रानडुकर, रानमांजरी उडणारी खार, काळयातोंडाची व लालतोंडाची माकडे, वटवाघळे आणि खवल्यामांजर आदि जंगली प्राणी बहुसंख्येने आढळतात. शाकाहारी व मासांहारी प्राणी या ठिकाणी असल्यामुळे प्राण्यांना पोसणारी जैविक अन्नसाखळी (Bio-Food-Chain) येथे आपोआप पूर्ण होते. जीवो-जीवस्य जीवनम या संस्कृत सुभाषिताचा अर्थ ही जैविक अन्नसाखळी आपल्याला सहज समजाऊन सांगते.

वन्यप्राण्यांशिवाय जमिनीवर सरपटणार्‍या सापवर्गीय प्रजातीमध्ये अजगर, नाग, धामण, पट्टेरी मण्यार, कोब्रा, साधीमण्यार आदी प्रकारचे विषारी तसेच बिनविषारी साप मोठया प्रमाणात नागझिर्‍यात आहेत. याशिवाय घोरपड, कासव पण आपल्याला आढळून येतात.

तसा गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील पक्षीजगत पण समृध्द आहे. येथील तलावांमध्ये १६ प्रकारचे मासे आढळतात. तर पक्ष्यामध्ये करकोचे, मोर, सर्पगरुड, गरुड, घुबड भृगंराज, स्वर्गेयनर्तक, खाटीक हळद्या खंडया, शिंगचोचा, सुतार, तितर, बदके, बगळे, आणि पाणवठयावर हमखास दरवर्षी आढळणारे स्थलांतरीत व नोंद घेण्यासारखे पक्षी या भागात आढळतात.

राघू किंवा लालकंठाचे पोपट या भागात अक्षरश: हजारोंच्या संख्येने आहेत. सायंकाळच्या वेळी तलावांच्या काठावर शेकडो पोपटांचा कलर व ऐकणे हा सुखद अनुभव नागझिर्‍यांच्या तलावांच्या काठी आपल्याला घेता येतो. पर्यटकांचे आकर्षण असणारा जंगलाचा राजा वाघ दरवर्षी मार्च ते जून दरम्यान जंगलातला निश्चित अशा पाणवठयावर हमखास दर्शन देतो. मात्र यासाठी आपल्यामध्ये हवी वेगळीच वृत्ती निसर्गात रममाण होण्याची ओढ.

कवि केशवसुतांच्या ओळीमध्ये सांगायचे झाले तर-जेथे ओढे वनराजी तेथे वृत्ती रमे माझी या ओवीचा भावार्थ आपल्यालाही जोपासता येईल, नागझिर्‍यास भेट दिल्यावर. चला तर मग पुढच्या पर्यटन काळात आक्टोंबर ते जून या कालावधीत एकदा तरी वैभवसंपन्न निसर्गसंपन्न, पर्यावरण संपन्न व जैविक सारखळीतले घनदाट नागझिरा अभयारण्याला भेट द्या व आनंदित व्हा.

solapur pune pravasi sangatana