अभयारण्य

श्रीक्षेत्र भीमाशंकराच्या सह्याद्री भूमीत

कोकणात सरासरी २५० से.मी. पाऊस दरवर्षी पडतो. धरणे तुडुंब भरल्यावर व काही ठि़काणी धरणे नसल्याने महाराष्ट्राच्या एकूण जलसंपत्तीच्या ४६ टक्के पाणी नदीनाल्यातून समुद्राकडे जाते. ते पाणी अडविले गेले तर कोकणातील माणूस ख-या अर्थाने सुखी होईल. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात कधी अंमलात येणार आहे? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते. सह्याद्री पर्वताच्या विशिष्ट स्वाभाविक रचनेमुळे महाराष्ट्रातील नद्यांचे दोन प्रकार स्पष्ट दिसतात. सह्याद्रीवर उगम पावून अनेक नद्या कोकणपट्टी ओलांडून पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात. या नद्यांचे उगम सह्याद्री पर्वतावर साधारणपणे ५०० ते ७०० मीटर उंचीवर असून या नद्या पश्चिमेकडे सुमारे १०० ते १५० किलोमीटर प्रवास करुन अरबी समुद्रास मिळ्तात. याचा अर्थ उपयुक्त असे पाणी, खा-या पाण्यात मिसळून उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा अशी परिस्थिती रायगडकरांवर नेहमीच येते. रायगड जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, गांधारी, पाताळगंगा, व भोगावती या नद्यांचे उगमस्थान सह्याद्रीतच आहे. परंतु यातील बहुतेक नद्या आता ऊगमस्थानापासून ५० ते ६० कि.मी. अंतरावर कारखानदारीमुळे प्रदूषित होउन पुढे समुद्राला मिळ्त असल्याने ऊगमस्थानापासूनच ५० ते ६० किलोमीटर अंतराच्या अलिकडे पाणी आडवा, पाणी जिरवा ही मोहीम ख-या अर्थाने राबविली पाहिजे. मात्र त्या उपनद्यांचे उगमस्थान रायगड जिल्ह्यामधूनच आहे. अशा उपनद्यांवर मंजूर झालेले परंतु रखडलेल्या पाटबंधारे योजनांचा पाठपुरावा करण्याची आज गरज आहे. याऊलट सह्याद्री पर्वतावर उगम पावूनही एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भीमाशंकरजवळ उगम पावून भीमा नदी कर्जतजवळ रायगडमध्ये न उतरता पुणे- सोलापूर या जिल्ह्यातून वाहणारी अशी ही एकमेव नदी असल्याने तिचा उपयोग पूर्व महाराष्ट्रातील जनतेला होत आहे. याच भीमा नदीला पुढे कुकडी, धोम, पवना, इंद्रावती, मुळा मुठा, गंगावती, वेळ्वंटी, नीरा, क-हा, सिना या नद्या मिळतात.
अलिकडेच भीमाशंकर येथे जाऊन आलो, भीमा खोर्‍यात फिरत असताना भीमा नदीवर डिंबे, कुकडी, चाकरमासाना मोठमोठी धरणे होत असताना पाहण्यात आली आणि परत एकदा आमच्या रायगडमधील अरबी समुद्राला मिळणा-या नद्यांची आठवण झाली. राजगुरु नगर, घोडेगाव या परिसरात एखाद्या नदीप्रमाणे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे वळवण्याचे काम सुरु असून येत्या दोन-तीन वर्षात हजारो हेक्टर शेतजमीन या कालव्यांच्या पाण्याखाली येऊन भीमा खो-याचे नंदनवन झालेले पहावयास मिळेल. आजही येथील शेतकरी वर्ग भाजीपाला व बागायतीत मग्न आहे. रायगडमधील आमच्या नद्यांची लांबी जास्तीत जास्त १५० किलोमीटर समुद्रापर्यंत असते. परंतु भीमा नदीचे कार्यक्षेत्र सुमारे ४५१ किलोमीटर असे आहे. इंद्रायणीच्या काठी देहू व आळंदी ही तुकाराम महाराज यांच्या वास्तव्यांनी पवित्र झालेली तीर्थक्षेत्रे सा-या महाराष्ट्राला परिचित आहेत. भीमेच्या कठावरील मोठे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आहे. तेथे अर्धवर्तुळाकार वाहणार्‍या भीमेला चंद्रभागा म्हणतात. म्हणजे सह्याद्रीवरील भीमाशंकरवरुन उगम पावणा-या भीमा नदीची लांबी ४५१ किलोमीटर असून पुढे ही नदी कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमेवर रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते. चंद्रभागेच्या विशाल वाळवंटात पंढरीला लाखो वारकरी आनंदाने नाचतात, भीमा-भागा गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ करुन पावन होतात. ती भीमारुपी नदी, भागीरथी गंगेचं जुनं रुप आहे. त्यामुळे पुढे कर्नाटकमध्ये जाणा-या या नदीचा प्रवाह पाहिला की, महाराष्ट्राच्या या विठोबाचे आणि कर्नाटकचे संबंध लक्षात येतात.'कानडा राजा पंढरीचा' या ओळीत या भीमा नदीने ही दोन राज्य नैसर्गिकरीत्या जवळ आणली असली तरी व्यावहारिक जगात मात्र कर्नाटक,महाराष्ट्र सीमावाद माणसानेच कसा निर्माण केला आहे याचे प्रत्यंतर गेले कित्येक वर्षे आम्ही अनुभवत आहोत. भागीरथी, गंगा स्वर्गातून श्री शंकराच्या डोक्यावर उतरली आणि भीमरुपी गंगा भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या रुपाने अवतरली. त्या भीमा नदीचे उगमस्थान बरा ज्योतीर्लिंगापैकी भीमाशंकर या नावाने प्रसिध्द आहे.
पावसाळ्यात तुरळक वाहतूक असणा-या मंचर ते भीमाशंकर हा रोड श्रीवणी सोमवार असल्याने रहदारीने फुलून गेला होता. मारुती व मोठ्या प्रमाणात जीपगाड्यांनी या खिंडीला घाटाचे स्वरुप आणले होते. अरुंद रस्ता व पावसामुळे रस्ते नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र पुणे जिल्ह्याच्या बांधकाम खात्याने रस्त्याची अखंडता हीच देशाची अखंडता असे बोर्ड लिहून आपली कार्यक्षमता लपविली होती. एरवी पोलिस खात्याबद्दल लोकांची भावना तशी नापसंतीची असते, परंतु राजगुरुनगर व भीमाशंकरच्या पोलिसांची खरी सेवा लोकांना पाच-पाच किलोमीटर अंतरावर पहावयास मिळत होती. मुसळ्धार पावसात व गडद धुक्यात केवळ छ्त्रीचा आधार घेवून वळणा-वळणावर हे पोलिस ओल्या अंगाने वाहन चालकांना मार्गदर्शन करीत होते. लायसन्स दाखवून कगदपत्र दे हा नेहमीचा प्रकार येथे नेव्हता, खुद्द मंदिरातही भक्तांच्या सेवेत पोलीस सामील झाल्याने अनेकांनी येथे पोलिसांबद्दल चांगले उदगार काढले. अर्थात मंदिरात बसलेले पोलीस झट्पट दर्शन घ्या असे सांगून विजेच्या वेगाने भक्ताला बाहेरचा मार्ग दाखवत होते. त्याबद्दल एवढ्या दूरवरुन येवूनही दोन मिनीटे नामस्मरण करता आले नाही याचे दु:ख भक्तांना होत होते. परंतु दिवसभरात येणा-या सुमारे चार ते पाच लाख भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीसांच्या हातात तरी काय होते? बाहेर उभ्या असणा-या भाविकांना पावसात ताटकळत ठेवणेही काही बरोबर नव्हते त्यामुळे पोलीसांनाही दोष देण्यात अर्थ नव्हता.
शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, बाळाजी विश्वनाथ यांचे हे स्थान अत्यंत आवडीचे होते. रघुनाथदादा पेशवे यांनी या क्ष्रेत्रावर एक फार मोठी विहीर बांधली होती, पुण्याचे चिमाजी पंताजी नाईक, भिडे, सावरकर यांनी या मंदिराचा १७३७ साली सभामंडप बांधला असा उल्लेख असला तरी त्यानंतरच्या काळात हे सभामंडप नादुरुस्त होऊन पडले असावे. कित्येक दिवस मंदिर एकाकी होते, अलिकडेच राजस्थानचे कारागीर आणूनसभामंडप पूर्वीच्याच पार्श्वभूमीवर बांधले आहे. १७७३ नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. हे मंदिर हेमाडपंथी असून त्यावर दशावताराच्या सुरेख मुर्ती कोरल्या आहेत, श्री शंकराच्या मंदिराच्या शेजारीच नंदिचे स्वतंत्र मंदिर आहे, तेथे पाच मण वजनाची घंटा आहे,च्यावर इ.स. १७२९ असा उल्लेख आहे. या घंटेच्या आवाजाने सारा परिसरच मंत्रमुग्ध होतो. मोक्षकुंड, ज्ञानकुंड, गुप्तभिमाशंकर, सर्वतीर्थ, पापनाशनी, आख्यातीर्थ, व्याघ्रपादतीर्थ, साक्षीविनायक, गोरक्षनाथांचा मठ, दैत्यसारनी, कमळजादेवीचे स्थान, कमळजा तळे, हनुमान तळे अशी पुष्कळ दर्शनीय स्थळे आजुबाजुला आहेत.
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वरप्रमाणे येथे पाय-या आहेत, परंतु कनकेश्वराला डोंगर चढावयाला लागतो तर तेथे तो उतरायला लागतो. एस्.टी बस स्थानकापासून या दुहेरी पध्दतीच्या रुंद पाय-यांना सुरवात होते, त्यामुळे चढताना किंवा उतरताना फारसा त्रास होत नाही. रायगड जिल्ह्यातील खांडस हे गाव येथून फक्त ८ ते ९ किलोमीटर आहे. येथुन गणपतीघाट किंवा शिडीघाट या रस्त्याने फारच लवकर भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता ऊभा चढावयाचा असल्याने अवघड आहे, अनेक ठिकाणी लाकडी शिड्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेक अपघात येथे झाले आहेत. या रस्त्याचा वापर सध्या अदिवासी किंवा जंगलखात्याशिवाय कोणच करीत नाही. हल्ली रायगडमधुन वाहनाने भीमाशंकरला येण्यासाठी लोणावळा, तळेगाव, चाकण, मंचर, राजगुरु मार्गे यावे लागते. सुमारे २२५ किलोमीटर फेरा घालुन परत रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असे यावे लागते. भीमाशंकर हे वाहन मार्गाने पुण्याच्या उत्तरेस ११९ किलोमीटर आणि नागोठण्यापासून २२५ किलोमीटर अंतरावर असले तरी भौगोलिक दृष्ट्या ते रायगडाच्या सरहद्दीवर असल्याने या भागात फिरताना कोकणात असल्यासारखा भास होतो. प्रचंड धुक्यात कुठे फिरता आले नसले तरी येथील नागफणी हा भाग फारच उग्र आणि भयंकर असा आहे. सुमारे तीन हजार मीटर उंचीवरुन येथून खाली कर्जत-माथेरानचा देखावा विमानातून पाहिल्यासारखा दिसतो, असे निर्मल गुरुजी यांनी आपल्या बारा ज्योतीर्लिंग या पुस्तकात नमुद केले आहे. तुटलेल्या या कोकण कड्यावरुन तो देखावा पाहण्यासाठी एकाने खाली पालथे पडुन दुस-याने त्याचे पाय ओढुन धरुन जय जय भीमाशंकर असा घोष येथील थंडगार वा-याच्या झोतावर केल्यावर एक वेगळीच अनुभुती येथे मिळ्ते. खरं म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव येथेच मिळत होता म्हणून श्री शंकरांनी येथे वास्तव्य केले होते, असे आमच्या रांगेत असलेले भाविक बोलत आणि तेच खरे होते. आमची जीप भीमाशंकरकडे जात असताना आणि भीमाशंकरकडून येत असताना तेथील पोखरा घाटात आल्यावर निसर्गरम्य व मनोहर दृष्य अलंकारांनी नटलेला हा प्रदेश अबू पहाडाची आठवण करुन देत होता. सौंदर्यपूर्ण विविधतेचा ईश्वरी आणि नैसर्गिक साक्षातकार या कोकण माथ्यावरील परीसरातच पहावयास मिळाला, त्यामुळे भर पावसात पोखरीचा नागमोडी घाट चढत आणि उतरत असताना हिरव्यागार डोंगरावरुन मातृत्वाच्या ओढीने धरणीमातेकडे झेपविणारे ते पांढरे शुभ्र धबधबे मनाची प्रसन्नता वाढवित होते. भातांच्या हिरव्यागार खलाट्या व त्यापेक्षा थोडे उंच हिरवेगार मातीचे छोटे छोटे चौकोनी बांध आणि त्यावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह ईश्वरानेच या रांगोळीचा सडा मुक्त हस्ताने मानवाला अर्पण केला आहे अशी धुंद परिस्थिती येथे होती. कडेला डोंगरमाथ्यावर आणि हिरव्यागार झुडूपात वास्तव्य करणा-या त्या गावातील घरांची गावठी पध्दतीची ती लाल भडक आणि पिवळ्सर कौले एखाद्या पुष्पगुच्छाची आठवण करुन देत होती. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये जगण्यासाठी धडधपडत असलेला तो भीमाशंकर परिसरातील डोक्यावर घोंगडी घेतेलेला खेडुत तेथे असलेल्या हिंस्र प्राण्यांशी आणि नैसर्गिक आपत्तींशी सदैव सामना करावयास लागत असल्याने की काय, काटक दिसत होता. हवामानातील फरकामुळे दाट धुके व वार्‍याबरोबर फुलदाणीतील अत्तराप्रमाणे शिंपडुन पडणारा तो पाऊस भीमाशंकर परिसराची विशालता अधिकच वाढवत होता. रानआंबा, जांभुळ, उंबर, साग, ए॓न, हिरडा, आवळा, शिरीष, खैर, शिसव व वेताच्या त्या गर्द झाडीने गच्च भरलेला तो परिसर. भर मे महिन्यातही येथे सूर्याचे दर्शन होत नसेल असे तेथील वातावरणावरुन जाणवले, कारण पावसाळ्यातील दिवसात दुपारी एक वाजता देखील मोटारीचे हेडलाईट तीन ते चार फुटापलीकडे सरकत नव्हते. एवढ्या मध्यरात्रीच्या गच्च काळोखाप्रमाणे येथे अंधार होता.
हे जंगल राखीव व संरक्षित असल्याने शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती व डिंक, मध यासाठी भीमाशंकर प्रसिध्द आहे. येथील जंगलात अस्तीत्वास असलेली शेकरु, बिबळ्या, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प हे प्राणी या जंगलाला तर परिचित आहेतच परंतु मोर, रानकोंबडे, सकात्री, कोकीळ, सूर्यपक्षी, घुबड, ससाणा, पिंगळा या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या आवाजात रमणारा येथील शेतकरी गॅस, अपचन, डायबेटीस, हृदयविकार, रक्तदाब या आधुनिक काळातल्या श्रीमंत रोगापासून खूप खूप दूर आहे. थोड्यावेळासाठी या रोगाचे जे प्रवासी येथे आले होते ते परत शहराकडे आपल्या वाहनातून जाणार होते, शेवटी निसर्गाचे सान्निध्य व बिअरबारचे सान्निध्य यांच्यात तडजोड झाली तर चांगल्या तीर्थक्षेत्राचेही पर्यटन केंद्र होण्यास वेळ लागत नाही. परंतु येथे पर्यटन केंद्र असूनही ही परिस्थिती नव्हती, कारण हा परिसर १९७४ पासून दारुमुक्त आहे असा तेथील एक बोर्ड प्रवाशाला संद ेश देत उभा होता.

solapur pune pravasi sangatana