तिकोना किल्ला

तिकोना किल्ला : नावाप्रमाणेच हा किल्ला त्रिकोणी आहे. चढायला अतिशय सोपा आहे. अर्ध्या तासात पायथ्यापासून वरपर्यंत जाता येतं. १६५७ साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला. पवना, मावळ या परिसराची पाहणी करण्यासाठी या किल्ल्याचं स्थानं मोक्याचं होतं. त्याची जबाबदारी शिवरायांनी नेताजी पालकर यांच्याकडे दिली होती. संभाजी राजांची औरंगजेबचा मुलगा अकबर याच्याशी भेट इथेच झाली. तिथे काही काळ राहण्यासाठी त्याला संभाजी राजांनी परवानगी दिली होती. १८१८ साली हा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिशांशी युद्ध झालं. त्यामध्ये किल्ल्याची हानी झाली. तुंग-विसापूर-लोहगड हे किल्ले आणि पवना डॅम असं अप्रतिम दृष्य इथून दिसतं. किल्ल्यावर छान मंदिर आहे. एक गुंफा आहे. त्यामध्ये १०-१५ जण राहू शकतात. पाण्याचं टाकंही आहे. तिथून बालेकिल्ल्यावर जाताना तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष दिसतात. वरती महादेवाचं मंदिर आहे.
लोहगड व विसापूर किल्ले लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली इथून जवळ आहेत. तिथून भाजे गावात जायचं. लोहगड चढण्यासाठी मळलेली वाट असल्यानं चुकायचा प्रश्न येत नाही. वाटेत सुरुवातीला बौद्धकालीन भाजे लेणी लागतात. मुद्दाम थांबून बघावं अशा या लेण्या आहेत. तिथून साधारणा दीडेक तासात पायथ्याच्या लोहगडवाडी या गावापर्यंत येता येतं. तिथल्या पठाराच्या एका बाजूला लोहगड आणि दुसऱ्या बाजूला विसापूर किल्ला आहे. तिथून लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. लोहगड, विसापूर व तिकोना हे सातवाहनकालीन किल्ले आहेत. त्यांनी बहमनी, निझामशाही, आदिलशाही, शिवकाल अशा अनेक राजवटी पाहिल्या. इथल्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होई. या परिसरात लेण्याही अनेक आहेत

solapur pune pravasi sangatana