प्रवाशांना कधी पावणार?

23/09/2013 13:41
गणपतीवर भक्तांची किती श्रद्धा आहे, याचा प्रत्यय गणेशोत्सवाच्या काळात येतो. आबालवृद्ध, महिला-पुरुष सर्वच जण दहा दिवस गणरायाच्या भक्तीत लीन होऊन जातात. भाविक त्याला वेगवेगळय़ा रूपात पाहतात. कुणाला तो सुखकर्ता वाटतो तर कुणाला दु:खहर्ता. बुद्धिवादी त्याला विद्येचा देवता मानतात, तर कलेचा देवता म्हणून तो कलाकारांमध्ये पूजला जातो. अशी गणेशाची अगणिक रूपे आहेत. त्याच्यापुढे नवस बोलणार्‍या भाबड्या भाविकांची संख्या काय कमी नाही. कोण आर्थिक उन्नतीसाठी नवस बोलतो, तर कोण नोकरीसाठी गणरायाला साकडे घालत असतो. काहींना गणरायाच्या आशीर्वादाने मूलबाळ हवे असते, तर काहींना आपल्या मुलाबाळांचे भले व्हावे असे वाटते. त्यासाठी हे भक्तगण तासन्तास रांगेत उभे राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेत असतात. गणपती पावतो किंवा नाही, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यावर अधिक भाष्य करणे इथे उचित ठरणार नाही. परंतु मुंबईत रेल्वेला मात्र यंदा गणपती पावला असल्याचा सुखद अनुभव मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी रेल्वेच्या अधिकार्‍यांना नवसदेखील बोलावे लागले नव्हते. तरी गणरायाने त्यांना थोडेथोडके नव्हे तर १0 कोटींचे घसघशीत दान दिले आहे. विशेष म्हणजे त्याने मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला विभागून पाच-पाच कोटी दिले आहेत. हे थोडे चमत्कारिक वाटत असले तरी बाराआणे सत्य आहे. गणेशोत्सवाच्या १0 दिवसांत रोजच्या प्रवाशांव्यतिरिक्त दर्शनाच्या निमित्ताने लोकल रेल्वेचा सुमारे ४३ लाख अतिरिक्त प्रवाशांनी लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. मुंबईत दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या ४0 लाख, तर पश्‍चिम रेल्वेच्या प्रवाशांची संख्या ३५ लाख इतकी आहे. त्यातून रेल्वेला दररोज सरासरी अनुक्रमे २ कोटी आणि १.७0 कोटी रुपये मिळतात. गणेशोत्सवात हाच आकडा २.५ कोटी आणि २.२२ कोटी रुपयांवर पोहोचला होता. यातून गणेशभक्तांच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत १0 दिवसांत १0 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न जमा झाले आहे. हे रेल्वेसाठी सुखद असले तरी प्रवाशांचे काय? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. मुंबईकर रेल्वेतून वर्षभर अक्षरश: मेंढरांसारखा प्रवास करतात. रेल्वे हे मुंबईतील प्रवासाचे अत्यंत जलद साधन आहे. त्यामुळे नरकयातना सोसूनही प्रवासी हे माध्यम निवडतात. मुंबईतील रेल्वेबाबतची सर्व धोरणे दिल्लीत ठरतात. एक दोन अपवाद वगळता रेल्वेमंत्रीपद महाराष्ट्रापासून नेहमीच दूर राहिले आहे. त्यामुळे मुंबईच्या समस्यांना रेल्वे मंत्रालयात कधीही न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करणार्‍या खासदारांचीही नेहमी या प्रश्नावर उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे मुंबई मंडळातून रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचे उत्पन्न मिळूनही यातील पैसा परत मुंबईकरांसाठी आणण्यात हे खासदार कमी पडतात. रेल्वे समस्यांबाबत राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकांना किती खासदार उपस्थित राहतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यातच राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयातील विसंवादामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारवर आहे; परंतु पोलिसांची रिक्त पदे भरण्यास रेल्वे मंजुरी देत नाही. त्यामुळे विशेषत: महिलांसंबंधित रेल्वेतील गुन्ह्यांत वाढ झाली आहे. रेल्वे प्रवाशांच्या या एक ना अनेक समस्या आहेत. त्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. १0 कोटी अतिरिक्त उत्पन्न देऊन रेल्वेला पावणारा गणपती प्रवाशांना कधी पावणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कोट्यवधींचे दान देणारा गणपती रेल्वे अधिकार्‍यांना प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धीदेखील देईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. किंबहुना गणपतीपुढे यानिमित्ताने तसे गार्‍हाणे घालूया. निदान पुढच्या गणेशोत्सवापर्यंत प्रवाशांच्या काहीअंशी तरी अडचणी दूर होऊ दे, अशी या गणरायापुढे प्रार्थना करूया!

solapur pune pravasi sangatana