घारापुरीचं शिल्पवैभव

 

 
भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरीचा लौकिक असला तरी जगाच्या पर्यटन नकाशावरही हे शहर मानाचं स्थान मिळवून आहे. सर्व महाराष्ट्रभर भटकंती करून पर्यटनासाठी ज्याचा लाभ होतो ते सारं काही मुंबई आणि त्याच्या परिसरात सामावलेलं आहे! संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सागर किनारे, पुरातन ऐतिहासिक वास्तू या बरोबरीनं अजिंठा- वेरूळच्या विश्वविख्यात लेण्यांची याद देणाऱ्या कान्हेरी-घारापुरी लेण्यांनी जागतिक वारसायादीत मानाचं स्थान मिळवलंय. भारताच्या पुरातन संस्कृतींचा वारसा लाभलेल्या लेण्यांपैकी ऐंशी टक्के लेणी आपल्या महाराष्ट्रभूमीत आहेत. त्यापैकी घारापुरीची लेणी संख्येनं कमी असली, तरी अभिजात कलाकृतींची गुणवत्ता घारापुरीच्या तीन गुंफांमध्ये नक्कीच आढळते.
 
 
मुंबईच्या सागरी प्रवेशद्वारापासून - म्हणजे ‘गेटवे ऑफ इंडिया’पासून नऊ नऊ सागरी मैलावरचे हे ठिकाण घारापुरी म्हणून ओळखले जाते. ‘श्रीपुरी’ या प्राचीन नावानं त्याची इतिहासात नोंद आहे. तसेच ‘अग्रहारपुरी’ या नामकरणानंतर कालांतरानं ‘घारापुरी’ हे नाव रूढ झाले. पोर्तुगीजांनी या इलाख्याचा ताबा घेतल्यानंतर येथील विशाल हत्ती शिल्पामुळे ‘इल्हा द एलिफंटा’ (हत्तीचे बेट) असंही नाव त्याला लाभलं. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मुस्लिम आणि पोर्तुगीज साम्राज्याच्या अधिपत्याखाली हे बेट होतं. हे ठिकाण मुंबईनजीक असलं तरी भौगोलिकदृष्टय़ा ते रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वसलेलं आहे.
 
 
इसवी सातव्या शतकात बहुधा घारापुरीचं एकेक लेणं खोदायला सुरुवात झाली. हा लेणी-समूह म्हणजे रेखीव शिल्पकलेचा देखणा नमुना आहे. आपल्या देशातील सौंदर्यशाली लेण्यांतील गुहा - मंदिरं ही तर आणखीन एक अजब शिल्पाकृती आहे. घारापुरीतील गुहा-मंदिर म्हणजे स्तंभयुक्त, भव्य दालन! त्यावर द्रविडी शैलीचा प्रभाव असून ही कलाकृती निर्माण करताना उद्भवलेल्या अडचणींमुळे त्यात एकसूत्रीपणाचा अभाव आहे. घारापुरी बेटावरची बहुतेक शिल्पं शिवाच्या जीवनावर आधारित असून त्या काळच्या शैवपंथीय जीवन शैलीची ती साक्ष देतात. या लेण्यात गंगावरतण अंधकार सुदवध- तांडवनृत्याचं विलोभनीय दर्शन घडतं. लेण्यातील महामंडप 130 फूट लांबी- रुंदीचा आणि 17 फूट उंचीचा आहे. सभामंडपाचं छत 26 खांबांवर आधारलेले आहे. प्रत्येक शिल्पाकृतीला पौराणिक कथा पार्श्वभूमी असून शिल्पकारांनी त्याला वास्तव रूप वाखाणण्यासारखं आहे. या लेणी समूहातल्या शिल्पांपैकी सर्वत्र गाजलं ते प्रख्यात ‘त्रिमूर्ती’ शिल्प. महाराष्ट्र पर्यटन विचार महामंडळाच्या बोधचिन्हासाठी त्याचा यथोचित वापर केला गेला आहे. छातीपासूनची ही शिवाची मूर्ती भव्य आणि उंच असून त्याद्वारे उत्पत्ती- स्थिती आणि लय ही शिवाची तीनही रूपं दाखवण्याचा प्रयत्न आहे. निर्माण कर्ता वामदेव, पालन कर्ता महेश आणि संहारकर्ता अघोरकौरव या शिवाच्या तिहेरी धावमुद्रा खूपच रेखीव वाटतात त्या चेहऱ्यांच्या प्रचंड आकारांमुळे हे शिल्प आपल्याला काही सांगतं आहे, असं वाटत राहतं. घारापुरीची ‘त्रिमूर्ती’ म्हणजे ब्रह्मा-विष्णू - महेष नसून, महेशाचीच ही तीन रूपं आहेत.
 
 
त्यापुढल्या नटेश्वर मूर्तीला शिवपुरुष किंवा ‘अर्धनारीश्वर’ असंही संबोधलं जातं. वरील दोन्ही मूर्तीची कलाकृती पेश करताना शरीराचा सुडौलपणा आकर्षक शरीर सौष्ठव आणि सजीव भावमुद्रा नजरेत पडतात. शिवपार्वती विवाह शिल्पकृती सादर करताना शिल्पकाराना आपलं कसब कौशल्य पणाला लावलेलं दिसतं. अनेक शतकांच्या स्थित्यंतरातून जाताना येथील काही देखण्या शिल्पकृतींची मोडतोड होऊनही काही शिल्पांची कलात्मकता जाणवते. परकीय आक्रमणामुळे देशाची संस्कृती आणि जीवन शैलीवर जसा दूरगामी परिणाम होतो, तसा या अनमोल कलाकृतींवरही झाला आहेच. वेरूळ लेण्यांप्रमाणेच धर्माध-सत्तांध आक्रमकांचा आणि पुढल्या काळात वाह्यात पर्यटकांचा उपद्रव या लेण्यावर झाल्याचे पाहून जीव खंतावतो. ज्या वेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात हे बेट होते, तेव्हा समुद्री चाचांच्या बोटींपासून बचाव करण्यासाठी या बेटाचा वापर व्हायचा. तेव्हा पोर्तुगीजांनी आपल्या सैन्याच्या युद्ध कवायती आणि शस्त्रास्त्र नेमबाजीच्या सरावासाठी या शिल्पाकृतीला लक्ष केल्याचं बोललं जातं.
 
 
या शिल्पाकृतीशिवाय चतुर्भुज द्वारपाल, गणेशमूर्ती, कार्तिकेय, ब्रह्मा-विष्णू ही सुरेख शिल्पदेखील आहेत. इथं वावरताना लेण्याच्या उत्तुंगपणासह त्याच्या विशिष्ट रचनेमुळे छायाप्रकाशाचा अद्भुत खेळही अनुभवता येतो. जगभरच्या पुरातत्त्ववेत्त्यांनी अभ्यासपूर्ण निष्कर्षातून या लेण्यांची तारीफच केली आहे. प्राचीन कला-संस्कृतीचा अभ्यास करणारे जगभरचे अभ्यासक इथं वर्षभर येत असतातच. पर्यटकांनाही अशा अभ्यासाची गोडी लावणारे ‘साइट म्यूझियम’ लेण्यांच्या परिसरातच आहे. मुंबईच्या परिसराचा आणि महाराष्ट्रातील अन्य लेण्यांचा सचित्र इतिहासही या संग्रहालयाच्या भिंतींवर पाहायला मिळतो.
 
 
घारापुरी बेटावर जाण्यासाठी ‘गेटवे’पासून करावा लागणारा सुमारे तासाभराचा सागरी प्रवास, हादेखील येथील स्थळदर्शनाचा एक सुखद अनुभव आहे. यांत्रिक होडीच्या प्रवासातून सभोवतालच्या विशाल सागरासहित मुंबई नैसर्गिक बंदराचे जवळून होणारे दर्शन तसेच व्यापारी आणि नौदलाच्या अजस्त्र बोटींचं घडणारं दर्शन अबालवृद्धांना भावणारं आहे. मध्येच एक खडक दिसतो- पूर्ण बांधीव! त्यावर आपले नौसैनिक पहारा देताना दिसतात. इथं नौदलाचा शस्त्रसाठा आहे, असं पर्यटक एकमेकांना सांगतात. एक लांबलचक पाइपलाइनही दिसते.. ती पाण्याची नव्हे; तेलाची आहे! तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये हे तेल वाहून नेले जाते.
 
 
‘रायबंदर’ येथे बोटीतून पायउतार होताच मुलांसाठी असावी, तशी एक छोटीशी रेल्वेगाडी आहे. त्यानंतर सुमारे 120 पाय-यांची चढण पार करताना वाटेतील वानरसेना आणि मोसमी पक्षीराज आपल्या स्वागतासाठी हजर असतात. संपूर्ण एक दिवसाच्या सहलीसाठी हे ठिकाण आता लोकप्रिय होत आहे. नोव्हेंबर ते मार्च या काळात तर येथे जरूर भेट द्यावी. पावसाळ्याव्यतिरिक्त गेट वे ऑफ इंडिया येथून मान्यताप्राप्त खाजगी सागरी वाहतूक सेवा उपलब्ध असतेच. लेणी समूहापर्यंत जाणारी चढण फार मोठी नाही; पण वृद्ध/ अपंग वा इतरांसाठी आवश्यकतेनुसतार पायथ्यापासून डोली-खुर्चीची सोय होऊ शकते.
 
 
महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची शान ठरलेल्या या लेणी समूहाला भेट देणाऱ्या स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय हे ध्यानी घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित येथे फेब्रुवारीत ‘एलिफंटा महोत्सव’ साजरा केला जातो. महोत्सव प्रसंगी रात्रीच्या प्रकाश झोतातील कार्यक्रमातून भारतीय नृत्य आणि शास्त्रीय संगीत कला सादर केली जाते.
अल्पकालीन वास्तव्यासाठी येथे राज्य पर्यटन खात्याची निवास व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे खाण्यापिण्यासाठी ‘चालुक्य’ हे सरकारी उपाहारगृह, तर अन्य छोटी खासगी उपाहारगृहे आहेत!
 
 
घारापुरी लेणी समूह स्थळदर्शन आणि अधिक माहितीसाठी संपर्क
सहल विभाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सी. डी. ओ. हटमेंट, योगक्षेमसमोर, मादाम कामा रोड, मुंबई- 400020.
दूरध्वनी -022-22026713-22027762.
घारापुरी येथील पर्यटन उपाहारगृह व्यवस्थापक : भ्रमणध्वनी : 9821410627

solapur pune pravasi sangatana